शरद वाघमारे
देशभरात एलपीजी गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.(Farmer Biogas Success Story)
गॅस मिळवण्यासाठी तासन्तास रांगा, वाढलेला खर्च आणि अनिश्चितता यामुळे ग्रामीण भागातही संकट निर्माण झाले आहे. मात्र, या समस्येवर मालेगावातील एका प्रगतिशील शेतकऱ्याने शाश्वत आणि पर्यावरणपूरक उपाय शोधून काढत आत्मनिर्भरतेचा आदर्श निर्माण केला आहे.
अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील शेतकरी भगवान रामजी इंगोले यांनी आपल्या शेतातील जनावरांच्या शेणाचा उपयोग करून बायोगॅस प्रकल्प उभारला आहे.
या प्रकल्पातून तयार होणाऱ्या गोबर गॅसवर त्यांच्या कुटुंबाचा दैनंदिन स्वयंपाक सहजपणे केला जात असून, एलपीजी सिलिंडरवरील अवलंबित्व पूर्णतः कमी झाले आहे.
कमी साधनांत मोठा फायदा
या बायोगॅस प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यल्प संसाधनांतही त्याची कार्यक्षमता. एका जनावराच्या दररोज मिळणाऱ्या शेणातूनही पुरेशा प्रमाणात गॅस निर्मिती होत असल्याने छोट्या शेतकऱ्यांसाठीही हा पर्याय सहज शक्य आहे. यामुळे घरगुती इंधनाचा खर्च शून्यावर आला असून, कुटुंबाला स्वयंपूर्णता मिळाली आहे.
शेतीसाठीही दुहेरी लाभ
बायोगॅस निर्मितीनंतर उरलेले शेण सेंद्रिय खत म्हणून वापरले जात आहे. त्यामुळे रासायनिक खतांवरील खर्च कमी झाला असून जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होत आहे. परिणामी उत्पादनातही सकारात्मक बदल दिसून येत आहेत.
पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पर्याय
गोबर गॅस हा पूर्णतः प्रदूषणमुक्त, सुरक्षित आणि आरोग्यास हितकारक इंधन आहे. पारंपारिक इंधनांच्या तुलनेत धूर नसल्यामुळे महिलांच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होत आहे. तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्यासही हा प्रकल्प उपयुक्त ठरत आहे.
इतर शेतकऱ्यांमध्येही वाढती लोकप्रियता
मालेगाव परिसरातील 'शेतकरी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनी'च्या सदस्य शेतकऱ्यांनीही या उपक्रमाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे इंधन खर्चात बचत होऊन शाश्वत शेतीला चालना मिळत आहे.
शासनाचे अनुदान उपलब्ध
या संदर्भात प्रगतिशील शेतकरी भगवान रामजी इंगोले यांनी सांगितले की, शासनाकडून बायोगॅस प्रकल्पासाठी अनुदान उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत इंधन बचतीसह पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा.
स्वयंपूर्णतेचा नवा आदर्श
मालेगावच्या या प्रयोगातून ग्रामीण भागात स्थानिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून स्वयंपूर्ण जीवनशैली कशी निर्माण करता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे. इंधन टंचाईच्या काळात हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Organic Farming : उत्पादन वाढीचा फॉर्म्युला सापडला? शेतकरी शेणखतावर भर देतायत
अधिक वाचा : Wood Fuel Price Hike : गॅस टंचाईच्या भीतीने लाकूड बाजारात तेजी; दरात मोठी उसळी!
