पालांदूर : शेतीत नफा डोळ्यापुढे ठेवून नियोजन केले, तर निश्चितच अपेक्षित यश पदरी पडते. मिरची उत्पादन करणे दिवसेंदिवस खूप कठीण होत आहे. मात्र, या कठीण परिस्थितीवर अनुभवाच्या आधाराने मात करीत दोन एकरांत मिरचीचे उत्पादन घेत एकराला लाख रुपये नफा अपेक्षित आहे. घरूनच लाल मिरची २०० रुपये किलोने विकत आहे.
बाग लालच लाल...
लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील अरुण पडोळे या उमद्या तरुण शेतकऱ्याने होतकरू शेतकऱ्यांपुढे नवा आदर्श पेरला आहे. हिरवी मिरची ८० रुपये किलोपर्यतच्या दरात बीटीबी येथे विकली. त्यानंतर दर उतरल्याने लाल मिरची करण्याचे नियोजन केले. दीड महिन्यात अख्खी दोन एकरांची बाग लालच लाल झाली. गत १५ दिवसांपासून तोडा सुरू आहे. सातऱ्याने मिरची सुकवून ग्राहकांना थेट २०० रुपये प्रति किलोने विकत आहे.
४० मजुरांना काम...
मिरची बागेतून केवळ एकटाच नफा कमवतो असे नाही तर... गावातील ४० ते ६० मजुरांच्या हाताला काम देऊन वर्षभर पुरेल एवढी लाल मिरचीसुद्धा मजुराला बागेतून मिळते. यामुळे वर्षभर मजूर स्वखुशीने बागेत काम करतो.
खुल्या बाजारात ३०० रुपये मिरचीचे दर
मिरचीचा बाजार तेजीत आहे. खुल्या बाजारात २८० ते ३०० पर्यंतचा दर मिळत आहे. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशात लाल मिरचीची आवक सुरू आहे. त्यांची चव व गावच्या मिरचीची चव यात फरक असल्याने गावच्याच मिरचीची मागणी अधिक आहे.
मिरची पिकवणे हा माझा छंद आहे. मिरचीवर व्हायरस खूपच त्रास देत आहे. दिवसेंदिवस उत्पादन खर्चात वाढ मोठी आहे; परंतु छंद व जिद्द कायम ठेवत मिरची पिकवली आहे. आधी हिरव्या मिरचीने ८० रुपये दर दिला. त्यानंतर लाल मिरचीसुद्धा २०० रुपयांचा दर देत आहे. गावातल्या गावात मिरची विकत असल्याचे सर्वांत मोठे समाधान आहे. मिरची खरेदीसाठी दूरवरुन नागरिक येत आहेत.
- अरुण पडोळे, मिरची उत्पादक, पालांदूर
