जळगाव : साक्री तालुक्यातील शेणपूर येथील आकाश काकुस्ते या प्रगतिशील शेतकऱ्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतीत मोठी प्रगती साधली आहे. त्यांनी चार एकर क्षेत्रावर फुले भगवा जातीच्या १२५० डाळिंबाच्या झाडांची लागवड केली होती.
चार एकरांतील या डाळिंब उत्पादनातून खर्च वजा जाता त्यांना एकरी किमान ८ लाख रुपये निव्वळ नफा मिळविला असून, त्यांच्या बागेतील डाळिंब बांगलादेशात विक्रीसाठी जात आहेत, तर काही परराज्यात जात आहेत.
आकाश काकुस्ते यांनी शासनाच्या पांडुरंग फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत लागवड केलेल्या या बागेला दोन वर्षांनी बहार आला आहे. लागवडीपासून बहार येईपर्यंत साधारणपणे एकरी ३० ते ३५ हजार रुपये खर्च येतो, ज्यातील उर्वरित खर्च योजनेतून अनुदानातून मिळतो.
बहारानंतर काकुस्ते यांनी दर आठवड्याला फवारणी आणि ठिबकद्वारे खताचे नियोजन केले. वेळोवेळी फवारणी व धुरळणी केल्यामुळे निरोगी फळे तयार झाली. ज्यामुळे या फळाला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळाले आहे.
उत्पन्नाचा केला विक्रम
या बागेतून एका झाडापासून काकुस्ते यांना सरासरी ४० किलो उत्पादन मिळाले. ज्यामुळे चार एकर क्षेत्रावर एकूण ४९ टन डाळिंबाचे बंपर उत्पादन निघाले. काकुस्ते यांनी शेताच्या बांधावरच व्यापाऱ्यांमार्फत डाळिंब १०५ रुपये प्रतिकिलो दराने विकले.
काढणीसाठी मजुरीचा खर्च साधारणपणे ५० ते ६० हजार रुपये आला. चार एकरातील या डाळिंब उत्पादनातून खर्च वजा जाता त्यांना एकरी किमान ८ लाख रुपये निव्वळ नफा मिळाला आहे.
यावर्षी डाळिंबाचे उत्पादन चांगल्या प्रकारे निघाल्यामुळे शेतीचा झालेला खर्च वगळता उत्पन्न चांगले आले, तसेच बागेतील डाळिंब यंदा बांगलादेशात विक्रीसाठी गेले असून, तर काही डाळिंब बिहार राज्यात गेले. नाशिक येथेही विक्रीला जात आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी पारंपरिक शेतीसोबत नवनवीन प्रयोग करणे गरजेचे आहे.
- आकाश काकुस्ते, डाळिंब उत्पादक शेतकरी, शेणपूर