अनिल महाजन
डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या धारूर तालुक्यातील अरणवाडी या छोट्याशा गावात पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून आधुनिक, वैज्ञानिक दृष्टिकोनातून शेती करणारे काही शेतकरी पुढे येत आहेत. त्यापैकीच एक नाव आज सर्वत्र चर्चेत आहे दादासाहेब श्रीपती फुटाणे. (Banana farming story)
कष्ट, नियोजन आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी केळीच्या लागवडीद्वारे केवळ स्थानिक बाजारातच नव्हे तर थेट इराण आणि इराकपर्यंत आपली शेती पोहोचवली आहे. (Banana farming story)
चार एकरांत केळीची स्मार्ट लागवड
दादासाहेब फुटाणे यांनी २४ ऑक्टोबर २०२४ रोजी आपल्या चार एकर शेतीत केळी पिकाची लागवड केली. त्यांनी जळगावच्या एका कंपनीची ५ हजार ५०० रोपे खरेदी केली आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही लागवड केली.
संपूर्ण प्रक्रियेत मजुरी, खत, औषधे आणि रोपांसह एकूण ५ लाखांचा खर्च झाला. पण फुटाणे यांनी एक एक रुपया नियोजनपूर्वक गुंतवला आणि त्याचेच मोठे फळ त्यांना मिळाले.
१५० टन केळीचे विक्रमी उत्पादन
काळजीपूर्वक निगा आणि वैज्ञानिक पद्धतींमुळे त्यांच्या केळी बागेने अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न दिले.
फक्त चार एकरांतून त्यांनी तब्बल १५० टन केळीचे उत्पादन घेतले. ही केळी टेंभुर्णी येथील अभिजीत बंदे यांनी थेट शेतातून खरेदी केली.
अरणवाडीची केळी इराण–इराकमध्ये
या शेतातून गेलेली केळी केवळ राज्यातच नव्हे, तर थेट इराण आणि इराक या देशांमध्ये निर्यात झाली.
ग्रामीण भागात बसून जागतिक बाजारपेठेत आपले उत्पादन पोहोचवणे हे फुटाणे यांच्या दूरदृष्टीचे आणि व्यवस्थापन कौशल्याचे खरे द्योतक आहे.
दर आणि उत्पन्न
या निर्यातयोग्य केळीला प्रति किलो २३ रु आणि १७ रु असा आकर्षक दर मिळाला. त्यामुळे केवळ चार एकरांमधूनच त्यांनी २७ लाख रुपयांचे एकूण उत्पन्न मिळवले.
खर्च वजा केल्यावरही त्यांना चांगला निव्वळ नफा मिळाला. जो आज अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
शास्त्रीय दृष्टिकोन आणि नियोजनाचे फळ
दादासाहेब फुटाणे यांनी पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
ड्रिप इरिगेशनद्वारे पाणी बचत,
संतुलित खत व्यवस्थापन,
रोगप्रतिबंधक फवारणी,
आणि नियमित माती परीक्षण यांचा वापर केला.
यामुळे केळीच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आणि निर्यातयोग्य दर्जाचे फळ तयार झाले.
परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान
फुटाणे यांची यशोगाथा आज अरणवाडी परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
त्यांनी दाखवून दिले की, मेहनत, शास्त्रीय शेती आणि योग्य बाजारपेठ निवडल्यास ग्रामीण शेतकरीही जागतिक स्तरावर पोहोचू शकतो.
अरणवाडीच्या मातीतून इराण-इराकच्या बाजारापर्यंत पोहोचलेल्या दादासाहेब फुटाणे यांच्या या यशोगाथेने दाखवून दिले आहे की 'आधुनिक शेती हीच खरी प्रगतीचा मार्ग आहे.' त्यांची कामगिरी केवळ आर्थिक यश नाही, तर ग्रामीण भागातील शेतीला नव्या दृष्टीने पाहण्याचा संदेश आहे.
शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नाही, ती एक उद्योग होऊ शकते. योग्य नियोजन, तंत्रज्ञान आणि बाजारपेठ जोडली तर शेतकरी स्वतःचा ब्रँड निर्माण करू शकतो. - दादासाहेब फुटाणे, शेतकरी