lokmat Supervote 2024
Lokmat Agro >लै भारी > मधाचे गाव ते देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम पाटगावचा प्रवास

मधाचे गाव ते देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम पाटगावचा प्रवास

Journey from Patgaon honey Village to one of the best tourist villages in the country | मधाचे गाव ते देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम पाटगावचा प्रवास

मधाचे गाव ते देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम पाटगावचा प्रवास

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील ‘मधाचे गाव पाटगाव’ म्हणून विकसित होत असलेले ‘पाटगाव’ कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र विजेते गाव ठरले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील ‘मधाचे गाव पाटगाव’ म्हणून विकसित होत असलेले ‘पाटगाव’ कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र विजेते गाव ठरले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम’ स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील ‘मधाचे गाव पाटगाव’ म्हणून विकसित होत असलेले ‘पाटगाव’ कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र विजेते गाव ठरले आहे. राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्रातून एकमेव पाटगावची निवड झाली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट व पर्यटन विभागाच्या सचिव व्ही. विद्यावती यांच्या हस्ते देण्यात आलेला हा पुरस्कार पर्यटन विभागाच्या पुणे विभागीय उपसंचालक शमा पवार, महात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशी, पाटगावचे सरपंच विलास देसाई, मधपाळ वसंत रासकर यांनी स्वीकारला.

शाश्वत विकासाचा पथदर्शी प्रकल्प राबविणाऱ्या पाटगावची सामाजिक, नैसर्गिक, आर्थिक निकषाच्या आधारे या स्पर्धेसाठी निवड झाली होती. देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ७५० हून अधिक गावांमधून केवळ ३५ गावांना हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला आहे. यापैकी ५ गावांना सुवर्ण, १० गावांना रौप्य तर २० गावांना कांस्य प्रमाणपत्र मिळाले आहे.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पाटगावसह पाच ग्रामपंचायती एकत्र येवून याठिकाणी तयार होणाऱ्या शुद्ध व नैसर्गिक मधाची निर्मिती करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा नियोजन समितीच्यावतीने पाटगाव मध्ये ‘मधाचे गाव पाटगाव’ हा उपक्रम राबविण्यात येत असून याव्दारे ही गावे स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न होत आहेत.  हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रोत्साहन देत निधी उपलब्ध करुन दिला आहे. मध विक्री व मध पर्यटनातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आबिटकर यांनी सुरुवातीपासून या उपक्रमाला प्रोत्साहन दिले आहे.

तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी यासाठी सहकार्य केले. मध उद्योगाबरोबरच या ठिकाणच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी वेळोवेळी बैठका घेवून सूक्ष्म नियोजन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील तसेच नाबार्ड, खादी व ग्रामोद्योग विभाग, महसूल, ग्रामविकास, पर्यटन विभागासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम केले आहे. नाबार्डच्या सहकार्यातून ‘पाटगाव मधउत्पादक शेतकरी कंपनी’ स्थापन करण्यात आली असून या माध्यमातून मध उत्पादक, विक्रेत्यांसह महिलांनाही रोजगार उपलब्ध करुन देत पाटगावबरोबरच आजूबाजूच्या गावांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी व मध निर्मिती व विक्री उद्योगाला चालना देण्यात येत आहे.

पाटगावच्या मधाचे ब्रँडींग, पॅकेजिंग, लेबलिंग व मार्केटींगसाठी प्रशासनाच्या वतीने सूक्ष्म नियोजन सुरु आहे. अधिकाधिक मध उत्पादकांना प्रशिक्षण देणे, मधपाळांना मधपेट्या देणे, आवश्यक कर्ज पुरवठा होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. पाटगावसह शिवडाव, अंतुर्ली, मठगाव,  तांब्याची वाडी या ग्रामपंचायती अंतर्गत गावांमध्ये मधपाळ तयार करुन येथील नागरिकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

या उपक्रमांतर्गत पाटगाव परिसरातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठीही उपाययोजना करण्यात येत आहेत. या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी कोल्हापूर ते पाटगाव मार्गावर माहिती फलक लावण्यात आले आहे. तसेच पर्यटन संचालनालयाच्यावतीने पर्यटकांसाठी याठिकाणी न्याहारी व निवासाची व्यवस्था, स्वच्छतागृह आदी सुविधा अधिक दर्जेदार पध्दतीने देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.  पाटगावमध्ये मधुमक्षिका पालनाबाबत माहिती देणारे माहिती केंद्र तयार करण्यात आले आहे. याठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांना मधाच्या पेट्या, मधनिर्मिती प्रक्रिया पाहता येण्यासाठी लवकरच या ठिकाणी हनी पार्क (मध उद्यान) तयार करण्यात येणार आहे. पाटगाव मध्ये सुरु होणाऱ्या सामुहिक सुविधा केंद्रात पाटगाव परिसरात तयार होणाऱ्या मधाचे संकलन प्रक्रिया व विक्री होणार असल्यामुळ येणाऱ्या पर्यटक व नागरिकांना शुद्ध व नैसर्गिक मध व त्यापासून तयार होणारी दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळेल.


गावाची नवी ओळख निर्माण झाल्यानंतर होणारे फायदे

सेंट्रल नोडल इन्स्टिट्यूट फॉर रुरल टूरिझम अँड होमस्टेजद्वारे पूर्ण पाठिंबा मिळेल आणि सहकार्य दिले जाणार आहे. यामध्ये गावाला G20 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाँच केलेला प्रोजेक्ट ‘लाईफ’ (लाईफस्टाईल फॉर इंन्व्हायर्नमेंट) च्या मोठ्या छत्राखाली आणले जाणार आहे. पर्यावरणासाठी जीवनशैली यावर आधारित काम सुरु होईल. आजपासून केंद्राकडून शाश्वत पर्यटनासाठी लाईफ अभियान सुरु करण्यात आले आहे. G20 राष्ट्रांमधील सर्वोत्तम पद्धतींचा उपयोग ग्रामीण पर्यटनाच्या प्रचारासाठी मार्गदर्शक म्हणून केला जाईल. या गावांचा आता राज्य, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर पर्यटन मंत्रालयाने संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटना आणि UNEP (संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम) तसेच इतर भागीदारांच्या पाठिंब्याने प्रचार केला जाईल.

युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रॅम, G20, केंद्रीय पर्यटन मंत्रालय व केंद्रीय वन मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने या गावांचा वर्षभर विकास होणार आहे. रुरल टुरिझम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही देशपातळीवरील संस्था देशातील या ३५ गावांचा विकास करणार आहे. या उपक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले आहे. मध उद्योगाबरोबरच या ठिकाणच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच नाबार्ड, खादी व ग्रामोद्योग विभाग, महसूल, ग्रामविकास, पर्यटन विभागासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम केल्याबद्दल पालकमंत्री श्री. केसरकर यांनी सर्वांचे कौतुक केले आहे.

पाटगाव येथे मधपाळांकडून मधाचे उत्पादन करण्यात येत आहे. या मधपाळांना खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत प्रशिक्षण देऊन सेंद्रिय मध संकलनासाठी साहित्य पुरविण्यात येणार आहे. मध संकलनानंतर पाटगाव येथे प्रक्रिया युनिट उभारुन प्रक्रिया झालेल्या मधाचे पॅकेजिंग व ब्रँडिंग करुन तो मार्केटिंगसाठी उपलब्ध होईल.

पाटगाव परिसरातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठीही उपाययोजना करण्यात येत आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी कोल्हापूर ते पाटगाव मार्गावर माहिती फलक लावण्यात आले आहे. पर्यटन संचालनालयाच्यावतीने न्याहारी व निवासाची व्यवस्था, स्वच्छतागृह आदी सुविधा दर्जेदार पद्धतीने देण्यात येणार आहेत. पाटगावमध्ये मधुमक्षिका पालनाबाबत माहिती देण्यासाठी माहिती केंद्र तयार केले आहे. लवकरच या ठिकाणी हनी पार्क (मध उद्यान) तयार करण्यात येणार आहे. पाटगाव मध्ये सुरु होणाऱ्या सामूहिक सुविधा केंद्रात पाटगाव परिसरात तयार होणाऱ्या मधाचे संकलन प्रक्रिया व विक्री होणार असल्यामुळे येणाऱ्या पर्यटक व नागरिकांना शुद्ध व नैसर्गिक मध व त्यापासून तयार होणारी दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळेल. तसेच पाटगावसह या भागातील गावे स्वयंपूर्ण होतील.

Web Title: Journey from Patgaon honey Village to one of the best tourist villages in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.