जयेश निरपळ
जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी, प्रचंड मेहनत करण्याची तयारी, प्रामाणिकपणा हे गुण अंगी असतील तर खडकाळ जमिनीतून देखील लाखो रुपयांचे उत्पन्न काढता येऊ शकते, हे गंगापूर येथील एका शेतकऱ्याने सिद्ध करून दाखविले आहे.
खडकाळ पाच एकर क्षेत्रांत कलिंगडाची लागवड करून अवघ्या दोन महिन्यांत या शेतकऱ्याने १५० टन कलिंगडाचे उत्पादन घेऊन ९ लाख रुपये मिळविले आहेत.
छत्रपती सांभाजीनगर जिल्ह्याच्या गंगापूर येथील ईश्वर राजपूत, असे या शेतकऱ्याचे नाव आहे. पारंपरिक पिकांना फाटा देत ते नवनवीन प्रयोग शेतीत करतात. कांदा पिकाची काढणी केल्यानंतर जानेवारी मध्ये त्यांनी शेताची ट्रॅक्टरने नांगरणी केली. त्यानंतर खडकाळ पाच एकर क्षेत्रात त्यांनी दोन महिन्यांपूर्वी कलिंगडची लागवड केली.
यासाठी त्यांना एकरी ८० हजार रुपयांचा खर्च केला. यात एकरी २० बॅग सेंद्रिय खत वापरले. पाच फूट रुंदीचे बेड करून त्यावर मल्चिंग कागद ३० रोल अंथरूण घेतले. यामध्ये एका कंपनीचे कलिंगडाची रोपे लावून घेतली.
बेसल डोस, दर तीन चार दिवसांनी आळवणी तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याच्या फवारण्याही त्यांनी केल्या. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच हे पीक तरारून आले होते. ६ मार्च रोजी कलिंगडच्या काढणीला सुरुवात करून देवगाव रंगारी येथील व्यापाऱ्याला ८ रुपये ६० पैसे किलो दराने त्याची विक्री केली.
यासाठी बळीराजा अॅग्रोचे संचालक तथा ड्रीप डीलर असोसिएशनचे संचालक रणजीत चव्हाण, तालुका कृषी अधिकारी बीजे जायभये, नानासाहेब सूर्यवंशी यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
अद्रकचेही घेतले विक्रमी उत्पादन
गत वर्षी राजपूत यांनी ३ एकर क्षेत्रांत अद्रक लागवड करून एकरी १८५ क्विंटल याप्रमाणे ५५५ क्विंटल एवढी अद्रक पिकवली होते. यातूनही त्यांना चांगले उत्पादन मिळाले. यासाठी त्यांना क्विंटलमागे दहा हजार रुपये भाव मिळाला होता.
शेतकऱ्यांनी ना उमेद न होता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे नियोजन करावे. यामुळे अल्पभूधारक शेतकरीही अत्यंत चांगले उत्पादन घेऊन आर्थिक स्थैर्य प्राप्त करू शकतो. कलिंगडातून मिळालेल्या यंदाच्या विक्रमी उत्पादनामुळे शेतीवरील निष्ठा वाढली असून, भविष्यातदेखील जास्त पाण्याच्या व खचिक पिकांकडे न जाता नवनवीन प्रयोग करीत राहणार आहे. - ईश्वर राजपूत, प्रगतशील शेतकरी, गंगापूर.