- मोहन भोयर
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील (Bhandara District) देव्हाडी येथील तरुण शेतकरी अरुण मुटकुरे यांची देव्हाडी शिवारात अडीच ते तीन एकर शेती आहे. त्यात ते नवनवीन प्रयोग दरवर्षी करतात. यावर्षी अरुण यांनी उच्च गुणवत्तेच्या टरबुजाची लागवडीकरिता (Tarbuj lagvad) सुमारे एक लाख रुपये खर्च आला. त्यातून त्यांना शुद्ध नफा अडीच ते तीन लाख होणार आहे.
धान शेतीला पर्याय म्हणून फळबाग शेतीची (fruit farming) लागवड करून केवळ दोन एकरात उन्हाळ्यात टरबुजाची शेती करून अडीच ते तीन लाखांचा शुद्ध नफा मिळविला. देव्हाडी येथील तरुण उच्चशिक्षित शेतकरी अरुण मुटकुरे यांनी ही किमया साधली आहे. मोहाडी तालुक्यातील मांडे सर येथे त्यांनी फळबाग शेती (Fal Sheti) लावली आहे. त्यांनी लावलेल्या फळबाग शेतीवर शालेय विद्यार्थी, लोकप्रतिनिधी व शेतकरी भेट द्यायला येतात. त्यांना अरुण मुटकुरे हे मार्गदर्शनही करीत आहेत.
रोप घेतले कंपनीमधून
माङगी येथील युनिव्हर्सल फेरो कारखानदाराने कारखाना परिसरात शेती करणे सुरू केले आहे. इस्रायल तंत्रज्ञानाने येथे फळांची व भाजीपाल्यांची रोपे तयार केली जातात. त्या रोप वनातून सुमारे ८० हजारांची रोपे खरेदी करून शेतीत लावण्यात आली. इतर खर्च हा २० ते २५ हजार इतका आला आहे.
४ ते १२ किलोपर्यंत टरबूज
या टरबुजाचे वजन ४ ते १२ किलोग्रॅमपर्यंत आहे. दिसायलाही हे टरबूज अतिशय आकर्षक असून तितकेच ते खाण्याला रुचकर गोड आहे. टरबुजाला स्थानिक स्तरावरच मागणी आहे. बांधावर येऊनच व्यावसायिक टरबूज घेऊन जातात. पुढीलवर्षी टरबुजाची लागवड करण्याचा मानस मुटकुरे यांनी व्यक्त केला.
इतर फळबाग शेती
टरबुजासोबतच या शेतीत पेरू, आंबा, काकडी, सिताफळ यांचीही शेती अरुण मुटकुरे करतात. त्याकरिता ते राज्यातील इतर प्रगतशील शेतकऱ्यांकडे जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी करतात, त्यांचा अभ्यास करतात व त्यानंतर मग स्वतःच्या शेतीत प्रायोगिक तत्त्वावर शेती सध्या ते करीत आहेत. नोकरीच्या मागे न लागता आत्मनिर्भर होण्याकरिता शेतीकडे त्यांनी स्वतःला वळविले आहे. इतर शेतकऱ्यांकरिता ते परिसरात आदर्श ठरत आहेत.
धानशेती बरोबरच नगदी पीक म्हणून फळबाग शेती शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवनवीन फळांची शेती करण्याचा माझा छंद आहे. यातून आर्थिक प्रगती तर होतेच, परंतु नवीन शिकायला मिळते. शेतकऱ्यांनी नगदी पिकांकडे वळावे.
- अरुण मुटकुरे, प्रगतिशील शेतकरी, देव्हाडी.ता. तुमसर