सोमनाथ खताळ
बीड : शिक्षण बारावी पास. नंतर कृषी डिप्लोमा. घरी शेती पाच एकर पण सर्व मुरमाड. उत्पन्न तर घ्यायचे पण कसे? हा प्रश्न. अखेर विदेशी फळांचा गुगलवरून शोध घेतला. यूट्यूबवर व्हिडीओ पाहिले.
त्यात ॲव्होकॅडो याची माहिती मिळाली. सुरुवातीला अमेरिका, बंगलोरवरून ५५ झाडे मागवून मुरमाड जमिनीत लागवड केली. ती आता ३०० झाली. आता याच विदेशी फळाने शेतकऱ्याला लखपती केले असून एकरी १० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न देत आहेत. शिवणीच्या शेतकऱ्याची यशोगाथा इतरांसाठी आदर्श आहे.
परमेश्वर आबासाहेब थोरात (वय ३७, रा. शिवणी, ता. जि. बीड) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. थोरात यांना पाच एकर मुरमाड जमीन आहे. सध्या यावर दोन एकरमध्ये कापूस आणि दोन एकरमध्ये बाजरीचे पीक आहे. परंतु आपल्याकडील पिकांचे उत्पादन होत नाही. झाले तरी त्याला भाव नसतो.
म्हणून ते चिंतेत होते. २०१७ साली त्यांनी गुगलवरून प्रगतशील देशांमधील पिकांची माहिती सर्च केली. यात इस्राईलमधील ॲव्होकॅडोची माहिती मिळाली. यासंदर्भात यूट्यूबवरून अभ्यास केला.
याचे फायदे, तोटे यासह बाजारभावाचीही माहिती घेतली. हे फळ रोगप्रतिकारक असून बीपी, शुगर कॅन्सर आदी रोगांवर गुणकारी असल्याचे समजल्यावर लागवडीचा निर्णय घेतला.
त्याप्रमाणे २०१८ साली अर्कासुप्रीम व्हरायटी इंडियन एचआरआय बंगलोर यांच्याकडून १५० रुपयाला ५० झाडे तर अमेरिकाहून हॅश व्हरायटीचे ३ हजार रुपयांनी ५ झाडे आणली. साधारण तीन वर्षांनी म्हणजेच २०२१ साली त्यांना पहिले उत्पन्न मिळाले. सर्व खर्च जावून यातून तीन ते चार लाख रुपये मिळाले.
हे पीक फायदेशीर असल्याचे समजताच त्यांनी यात वाढ करून आता २०२४ मध्ये एक एकरमध्ये १२ बाय १४ अंतरात ३०० झाडे लावली.
यामध्ये त्यांना सर्व खर्च जाऊन १० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळत आहे. वर्षाकाठी यात फवारणी, अंतर्गत मशागत, खतपाणी आदींसाठी दीड लाख रुपये खर्च येत असल्याचे थोरात यांनी सांगितले. आता ही शेती पहायला जिल्हाच नव्हे तर बाहेर जिल्ह्यातील शेतकरी येऊ लागले आहेत.
दुष्काळात टँकरवर जगवली झाडे
२०२३ साली जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती होती. विहीर, बोअर आदी जलस्त्रोत तळाला गेले होते. त्यामुळे ही झाडे जगवायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता. परंतु थोरात यांनी हार न मानता टँकरने पाणीपुरवठा केला. आठवड्याला शिवणी तलावातून पाच टँकर पाणी आणून विहिरीत टाकले. नंतर ते ठिबकने झाडांना दिले. यातही खर्च भरपूर झाला, असेही थोरात यांनी सांगितले.
लागवडीनंतर कधी मिळते फळ?
ॲव्होकॅडोची लागवड करण्यापूर्वी जमिनीत शेणखत, गांडूळ खत, रासायनिक खत टाकले जाते. झाडे चांगली आल्यानंतर जानेवारी, फेब्रुवारीत झाडे धुतली जातात. याच कालावधीत फुले येतात. वातावरणात बदल झाल्यावर बुरशीनाशक व कीटकनाशक फवारणी केली जाते.
फळे लागल्यापासून ते तोडण्यापर्यंत हा कालावधी सहा महिन्यांचा असतो. जून, जुलैमध्ये फळे तोडतात. वर्षातून एकवेळेस याचे उत्पादन घेता येते.
वजन अन् भाव किती?
ॲव्होकॅडो या फळाचे वजन साधारण २०० ते ५०० ग्रॅमपर्यंत असते. याला किलोप्रमाणे २०० ते ५०० रुपयांपर्यंत भाव मिळतो. बीडमधून ही फळे विक्रीसाठी पुण्याला पाठवली जातात. तेथून व्यापारी विदेशात पाठवत असल्याचेही सांगण्यात आले. याची चव ही मलई, बटरसारखी असते.
झाडाचे आयुष्य किती?
हे झाड लिंबू, मोसंबी याप्रमाणे दिसत असले तरी ते आंब्याच्या झाडासारखे होते. लागवड केल्यानंतर त्याचे आयुष्य हे जवळपास ५० वर्षे इतके आहे. दरम्यानच्या काळात सुरुवातीला कमी उंचीचे मुग, उडीद, सोयाबीनसह भाजीपाला ही पिके घेऊ शकतो. नंतर हे झाड मोठे झाल्यावर इतरही आंतरपिके घेऊ शकतो.
आरोग्यासाठीही फळ गुणकारी
या फळामध्ये व्हिटॅमिन के, सी, ई, बी ६, पोटॅशियम व फोलेट यासह इतर आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ते आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, हृदय, वजन कमी करणे, बीपी, शुगर, कर्करोग आदी आजारांवरही हे गुणकारी असल्याचे सांगण्यात आले.
अशी आली बीडला झाडे
अमेरिकाहून थेट झाडे, बिया किंवा वस्तू थेट आणण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे थोरात यांनी आपल्या उद्योजक मित्राची मदत घेतली. त्याच्या मार्फत अमेरिकेतील विद्यापिठातून बंगलोर विद्यापिठात आणली. तेथून ही झाडे बीडला घेऊन आलो. कृषीचे शिक्षण झालेले असल्याने याच झाडांचे कलम करून नवे रोप तयार केल्याचे थोरात यांनी सांगितले.
पाच एकर मुरमाड शेती; पण त्यात उत्पन्न मिळत नसल्याने चिंतेत होतो. गुगलवर सर्च करून प्रगतशील देशांतील पिके पाहिली. त्यात ॲव्होकॅडो पिकाची माहिती मिळाली. यूट्यूबवर शेकडो व्हिडीओ पाहून अभ्यास केला. २०१८ साली ५५ आणि आता २०२४ साली एक एकरमध्ये ३०० झाडांची लागवड केली. यात सर्व खर्च जाऊन १० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळते. हे सर्व फळे पुण्यात नेऊन मार्केटला देतो. एका किलोला २०० ते ५०० रुपयांपर्यंत भाव मिळतो. बीड जिल्ह्यात असे पीक कोणी घेतले नाही. परंतु हे फळ आरोग्यासाठीही लाभदायक आहे. - परमेश्वर थोरात, प्रगतशील शेतकरी, बीड