नितीन कांबळे
कडा : दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या आष्टी तालुक्यात कधीकधी पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावे लागते. अशा या तालुक्यात जिद्द, मेहनत व चिकाटीच्या जोरावर कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून वर्षभरात ५ लाख खर्च करून यशस्वी शेती करत 'भोतडी' येथील केळी (Bananas) 'इराण'च्या (Market) बाजारपेठेत पाठवून २५ लाखांचे उत्पन्न प्रयोगशील शेतकरी शंकर गिते याने घेतले.
आष्टी तालुक्यातील भातोडी येथील तरुण शेतकरी शंकर रामदास गिते यांनी पुणे येथून फेब्रुवारी २०२४ मध्ये ७२५० रोपे आणून पाच एकर क्षेत्रात ६ बाय ५ या पद्धतीने लागवड केली.
यासाठी शेततळ्याच्या माध्यमातून पाण्याची सोय करून ठिबक सिंचनद्वारे कुटुंबातील सदस्यांची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर ही बाग जोपासली.
ठिबक, रोपे, फवारणी, शेणखत, रासायनिक खते, मजुरी असा एकरी १ लाख ३० हजार खर्च आला. आता बाग तोडणी सुरू झाली असून, ही केळी इरणाच्या बाजारपेठेत गेली आहे.
१३ ट्रक भरून माल इराणच्या बाजारात
गिते यांनी केळीच्या बागेची काळजी घेऊन १७५ टन एवढा माल पाच एकरांत काढला. तो १३ ट्रकच्या माध्यमातून इराणच्या बाजारात दाखल झाला आहे. विशेष म्हणजे यासाठी विक्रीला कुठे न जाता थेट व्यापाऱ्यांनी बांधावर येऊन मालाची खरेदी केली.
कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
पहिल्याच वर्षी केळीची बाग लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर लागवड ते फळधारणा या कालावधीत आष्टी तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, मंडळाधिकारी प्रशांत पोळ, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक राजेंद्र धोंडे, कृषी सहायक बांगर, खाजगी कंपनीचे मालक योगेश डोके याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
नोकरीला शेती भारीच
तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता शेतात पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करून नवनवीन तंत्रज्ञान अवगत करावी. सोशल मीडियावर शेतीविषयक माहिती जाणून घेऊन त्याच बरोबर इतर जिल्ह्यातील शेतकऱ्याची प्रयोगशील शेती पाहून शेतीत कष्ट केल्यास नक्कीच नोकरीला हजार वेळा मागे टाकले एवढी कमाई होते, असे शेतकरी शंकर गिते यांनी सांगितले.
तालुक्यात २५ हेक्टर क्षेत्रावर केळीच्या बागा असून, दिवसेंदिवस शेतकरी नवनवीन फळबाग लागवड करत आहेत. परराज्यासह, इतर देशांत देखील आष्टी यासारख्या दुष्काळी भागातील फळे जात आहेत. अलीकडच्या काळात तरुण मोठ्या प्रमाणावर फळबाग बागेकडे वळाला असल्याचे तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी सांगितले.