करकंब : करकंब (ता. पंढरपूर) येथील संतोष खारे आणि राजेंद्र खारे या भावंडांनी जिद्द, चिकाटीच्या जोरावर दर्जेदार, निर्यातक्षम केळीची बाग जोपासली आहे.
केवळ दीड एकरात ११ महिन्यांत २० लाखांच्या केळी उत्पादनाची किमया साधली आहे. या खारे भावंडांना तीन एकर शेती आहे. त्यापैकी एक एकर द्राक्षबाग आहे. शेतीला जोडव्यवसाय म्हणून दोघे जण गार्डनचा व्यवसाय करत आहेत.
त्यांनी मागील वर्षी १० सप्टेंबर रोजी दीड एकरात सुरुवातीला नांगरट केली. त्यानंतर फणनी करून शेत रोटरून घेतले. ठिबक संच वापरून ६ बाय ५ अंतरावर २ हजार रोपे लावली.
खत व्यवस्थापन◼️ केळी लावताना निंबोळी पेंड वापरून त्यांनी पुढे पाच ते सहा दिवसांच्या अंतराने विविध खतांच्या १० आळवण्या केल्या.◼️ बांधणी करताना १३ ट्रेलर शेणखत, ८ टन कोंबडखत, जीवोग्रीन १२५ किलो, १८:४६, एमओपी, निंबोळी पेंड असा भेसळ डोस केला.◼️ त्यानंतर १९ :१९:१९, ह्युमिक अॅसिड, फॉस्फरीक अॅसिड, युरिया, एमओपी, १०:२०:२०, ३०:३५, फास्टर, केलामृत, फ्रूट स्पेशल, कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन, मायक्रोन्यूट्रेन, १३:४०:१३, १३:००:४५, ००:५२:३४, ००:६०:२०,००:४२: ४७ अशी विभागून खते दिली.
असा झाला खर्च२ हजार रोपे : ४४ हजार रुपयेठिबक : ३५ हजार रुपयेशेणखत १३ ट्रेलर : ७८ हजार रुपयेभेसळ डोस : २० हजार रुपयेविद्राव्य खते : १ लाख ५ हजार रुपये
असा एकूण २ लाख ८२ हजार रुपये खर्च झाले. ७० ते ७५ टन केळीला सरासरी ३० रुपये भाव मिळाल्यास २१ लाख ते २२ लाख ५० हजारांचे उत्पन्न मिळेल. त्यामधून २ लाख ८२ हजारांचा खर्च वजा करता १९ लाखांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा खारे बंधूंना आहे.
पारंपरिक शेतीला बगल देऊन शेतीकडे उद्योग म्हणून पाहिले तरच शेतकरी टिकेल. आमच्या केळीला इतरांपेक्षा २ रुपये जास्त दराने व्यापारी मागणी आहे. - राजेंद्र खारे, केळी उत्पादक, करकंब
अधिक वाचा: सामायिक शेतजमिनीची वाटणी करता येते का? काय आहे नियम? जाणून घ्या सविस्तर