नितेश बनसोडे
शेती पारंपरिक पद्धतीने न करता नियोजनात्मक पद्धतीने करत त्याला आधुनिकतेची जोड दिल्यास शेती निश्चितच फायदेशीर ठरते. नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील शेख फरीद वझरा येथील शेतकरी सय्यद जाफर सय्यद इब्राहिम यांनी शेख फरीद वझरा साठवण तलावच्या माध्यमातून माळरानात मोसंबी व पेरूची बाग फुलवून शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
जिल्ह्यातील माहूर तालुका हा अतिदुर्गम व आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो. याच भागातील सय्यद जाफर सय्यद इब्राहिम यांनी दुष्काळावर मत करत अस्मानी व सुलतानी संकटाला न घाबरता कष्ट करण्याची जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर डोंगराच्या पायथ्याशी खडकाळ अन् मुरमाड जमिनीत, मोसंबीची फळ बाग फुलवून त्या क्षेत्राचे नंदनवन केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
दिवंगत माजी आ. प्रदीप नाईक यांच्या दूरदृष्टीने निर्माण करण्यात आलेला सिंचन तलाव तेथील शेतकऱ्यासाठी वरदान ठरत आहे. सिंचन तलावाच्या साहाय्याने जाफर यांनी सहा एकर माळरानात तब्बल ६०० मोसंबी २०० पेरूची झाडे लावून शेतीला हिरवेगार केले आहे.
सोबतच अंतरपीक म्हणून मोसंबी खाली हरभऱ्याची लागवड केली आहे. एवढ्यावरच न थांबता हळद आणि लिंबू ही शेतात बहरले आहे. विशेष म्हणजे त्यांनी खरिपाचे सोयाबीन पीक ही मोठ्या प्रमाणावर घेतले असून, हरभरा काढणीनंतर टरबूजची लागवड करून उन्हाळ्यात उत्पादन घेण्याचा त्यांचा मानस आहे.
फळबाग शेतीतून भरगोस उत्पन्न
• बाबा शेख फरीद यांची पावन भूमी व माहूर तालुक्यातील अत्यंत दुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या शेख फरीद वझरा गावात प्राथमिक व माध्यमिक शिक्षना पेक्षा मोठी सोय नसल्याने आपल्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी जाफर यांनी शेतीतील उत्पन्नातून संभाजीनगर येथे पाठविले आहे.
• त्यांची मुलगी जरीना ही हैद्राबाद येथे नरसींग ऑफिसर पदावर कार्यरत असून तर मुलगा एम. ए. शिक्षण घेत आहेत. स्वतःचे शिक्षण जेम तेम ८ वी पर्यंत झाले असताना ही सारी किमया केली आहे. ज्यामुळे परिसरात त्यांचे मोठे कौतुक होत आहे.
आत्मविश्वासाच्या जोरावर मोसंबी व पेरूची लागवड केली. आधुनिक सिंचन व्यवस्थापन करून त्यांना पुरेसे पाणी उपलब्ध केले. परिणामी वर्ष भरात तीन पिके घेता येत आहे. - सय्यद जाफर सय्यद इब्राहिम.