Join us

Farmer Success Story : बोरगावच्या शिवाजी वाटेगावकरांनी केळी पिकात ११ महिन्यात केली ११ लाखांची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 17:17 IST

अडीच एकर केळीच्या शेतीतून बोरगाव (ता. वाळवा) येथील शेतकरी शिवाजी बापूबिरू वाटेगावकर यांनी ११ महिन्यांत ११ लाख ५५ हजारांचे उच्चांकी उत्पादन घेतले आहे.

नितीन पाटीलबोरगाव : आधुनिक शेतीची कास धरून केळी, द्राक्षबाग, शेवगा, पपई अशी वेगवेगळी उत्पादन घेतली आहेत. यावर्षी अडीच एकर केळीच्याशेतीतून बोरगाव (ता. वाळवा) येथील शेतकरी शिवाजी बापूबिरू वाटेगावकर यांनी ११ महिन्यांत ११ लाख ५५ हजारांचे उच्चांकी उत्पादन घेतले आहे.

सध्या केळीला २० रुपये किलो भाव आहे. त्यांनी अडीच एकर क्षेत्रात ७७ टन केळीचे उत्पादन घेऊन सरासरी १५ रुपये दराने ११ लाख ५५ हजार रुपये कमवून आधुनिक व कर्तृत्वान शेतकऱ्याच्या यादीत नाव मिळविले आहे.

शिवाजी वाटेगावकर यांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रा बरोबरच शेतीमध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग केले आहेत. आदर्श शेतकरी आशी ख्याती कमवली आहे. त्यांची शेती पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून शेतकरी येत आहेत.

शिवाजी वाटेगावकर यांनी २० फेब्रुवारी २०२३ रोजी जळगावमधून जी ९ जातीचे केळीची रोपे आणली होती. एकरी एक हजार ४०० रोपाप्रमाणे अडीच एकरासाठी तीन हजार ५९० रोपे खरेदी केली.

सुरुवातीला शेतीची उभी आडवी नांगरट केली. एकरी ६ टेलर व अडीच एकरात १५ ट्रॉली शेणखत घातले. यानंतर रान कुरटले, दोनवेळा रोटर मारून रान भुसभुशीत करून घेतले. यावर सहा फुटी गादी वाफा सरी सोडली.

५ फूट अंतरावर एक रोप दोन ओळीतील अंतर ६ ठेवून रोपांची लावण केली. केळीला पिक चांगल्या दर्जाचे आले आहे. त्यामुळे अडीच एकर क्षेत्रामध्ये जवळपास ७७ टन उत्पादन मिळाले आहे. शेतीमध्ये अधुनिक तंत्रज्ञानाचा त्यांनी वापर केल्यामुळे उत्पादन वाढले आहे.

या शेतकऱ्याच्या शेतीस तालुका कृषी अधिकारी यादव, श्रीकांत मंडले, माणिक पाटील, सखाराम गावडे, कुमार वाटेगावकर, संदीप वाकसे, आदी शेतकऱ्यांनी भेट देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले.

अडीच एकरांसाठी खर्चाची बाजू (रूपये)एक रोप - २२ रु. x ३,५९० = ७८,९८०लावण प्रती रोप २.५० x ३,५९० = ८,९७५आळवणी - ४,०००औषध फवारणी - ३,२००मेहनत (एकरी १५ हजार) - ३७,५००शेणखत (१५ डम्पिंग) - ६२,०००रासायनिक खत - ४२,०००

यावर्षी जास्त पाऊस झाल्याने रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाला. पण, दर चांगला मिळाल्यामुळे उत्पन्न चांगले मिळाले आहे. उसापेक्षा निश्चितच केळांसह अन्य फळपिकाची शेती परवडत आहे. कृष्णा काठावरील शेतकऱ्यांनी उसाला पर्यायी पीक म्हणून केळी उत्पादनाकडे वळायला हवे. जमिनीचा पोत चांगला राहण्यास मदत होणार आहे. - शिवाजी वाटेगावकर, बोरगाव, ता. वाळवा

अधिक वाचा: Farmer Success Story : सोमेश्वर साखर कारखाना कार्यक्षेत्रात या दोन शेतकरी भावांचे रेकॉर्ड ब्रेक ऊस उत्पादन; वाचा सविस्तर

टॅग्स :केळीशेतीशेतकरीपीक व्यवस्थापनसांगलीफलोत्पादनबाजार