Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीड एकर पेरू बागेतून शेतकऱ्याने घेतली ३ लाखांची झेप; आंतरपिकांतून देखील अतिरिक्त नफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 12:19 IST

Success Story : शेती परवडत नाही, अशी ओरड होत असतानाच दरसांगवी (चि.) येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने जिद्दीच्या जोरावर 'अशक्य ते शक्य' करून दाखवले. अरविंद सूर्यवंशी या अल्पभूधारक शेतकऱ्याने दीड एकर शेतात पेरूची बाग फुलवून ३ लाख १० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले असून, शेतकऱ्यांसमोर प्रगतीचा एक नवा आदर्श ठेवला आहे.

गोकुळ भवरे

शेती परवडत नाही, अशी ओरड होत असतानाच नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील दरसांगवी (चि.) येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने जिद्दीच्या जोरावर 'अशक्य ते शक्य' करून दाखवले.

अरविंद सूर्यवंशी या अल्पभूधारक शेतकऱ्याने दीड एकर शेतात पेरूची बाग फुलवून ३ लाख १० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले असून, शेतकऱ्यांसमोर प्रगतीचा एक नवा आदर्श ठेवला आहे.

सुरुवातीला पाण्याची टंचाई असतानाही सूर्यवंशी डगमगले नाहीत. त्यांनी उपलब्ध पाण्याचे काटेकोरपणे नियोजन केले. आधुनिक तंत्रज्ञान आणि ठिबक सिंचनाचा वापर करून त्यांनी पेरूची बाग जोपासली. या बागेत केवळ पेरूवर अवलंबून न राहता त्यांनी हरभरा आणि भाजीपाल्याची आंतरपिके घेऊन अतिरिक्त नफाही कमावला.

केवळ उत्पादन घेऊन न थांबता सूर्यवंशी यांनी बाजारपेठेचा अभ्यास केला. यावेळी त्यांनी शेतमाल स्थानिक बाजारपेठेत न विकता तेलंगणामध्ये निर्मल, निजामाबाद, नांदेड व इतर बाजारपेठेत २५ ते ५० रुपये प्रति किलो दराने पेरूची विक्री केला.

आता नजर 'आंतरपिकां'वर

​पेरूच्या यशस्वी हंगामानंतर सूर्यवंशी आता थांबलेले नाहीत. सध्या त्यांनी याच बागेत टरबूज, खरबूज आणि शेवग्याची लागवड केली असून यातूनही मोठ्या उत्पन्नाची त्यांना अपेक्षा आहे. त्यांच्या या यशोगाथेमुळे किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये फळबाग लागवडीबद्दल नवा उत्साह पाहायला मिळत आहे.

शेतकऱ्यांच्या प्रयोगाने अधिकारीही झाले थक्क

• सूर्यवंशी यांच्या यशस्वी प्रयोगाची दखल प्रशासनानेही घेतली. उपजिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, तहसीलदार डॉ. शारदा चोंडेकर आणि तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत नीमोड यांनी बागेला भेट देऊन पाहणी केली.

• सेंद्रिय खतांचा वापर, छाटणीची पद्धत आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे त्यांनी कौतुक केले. कापूस आणि सोयाबीनसारख्या पारंपरिक पिकांपेक्षा पेरूची बाग कितीतरी पटीने फायदेशीर ठरली.

• कापसासाठी खर्च करूनही १० हजारांचे उत्पन्न मिळाले नव्हते. पण पेरूने आर्थिक स्थैर्य दिले, असे शेतकरी अरविंद सूर्यवंशी यांनी सांगितले.

हेही वाचा : अबब, रामफळाचे किती फायदे; हृदयापासून ते केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यापर्यंत गुणकारी रामफळ

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded Farmer Earns ₹3 Lakhs from Guava Orchard, Intercropping Boosts Profit

Web Summary : A Nanded farmer, Arvind Suryavanshi, overcame water scarcity to earn ₹3 lakhs from his guava orchard. He used modern techniques and intercropping with chickpeas and vegetables for extra profit, selling in Telangana markets. He now cultivates watermelon, muskmelon and drumsticks.
टॅग्स :शेतकरी यशोगाथानांदेडनांदेडशेती क्षेत्रशेतकरीफळेबाजारफलोत्पादनमराठवाडा