Join us

स्वतःच बाजारपेठ शोधत सव्वा एकरातील पपईतून कमविले १२ लाख; 'पपईवाले काकडे' यांची यशकथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 16:19 IST

शेती उत्पादनासाठी बाजारपेठ महत्त्वाची असते. शेतकऱ्यांना दूरवर माल न्यावा लागतो; पण काहीजण स्वतःच बाजारपेठ शोधतात. उत्पन्नातून लाखोची उड्डाणे घेतात.

सचिन गायकवाडतरडगाव : शेती उत्पादनासाठी बाजारपेठ महत्त्वाची असते. शेतकऱ्यांना दूरवर माल न्यावा लागतो; पण काहीजण स्वतःच बाजारपेठ शोधतात. उत्पन्नातून लाखोची उड्डाणे घेतात.

यातील एक आहेत तरडगाव येथील अमोल काकडे. ४८ गुंठे क्षेत्रांतील पपईतून ते वर्षाला १२ लाखांहून अधिक उत्पन्न घेत आहेत. यामध्ये ते पुणे शहरात नेऊन स्वतःच पपईची विक्री करतात, हे महत्त्वाचे आहे.

अमोल काकडे यांच्या वडिलांनी १९९५ मध्ये पपईची बाग केली होती. त्यानंतर अमोल काकडे पपई पिकवत आहेत. पपई मार्केटला न देता ती पुण्याला नेऊन विक्री केली जाते. त्यामुळे 'पपईवाले काकडे' अशी ओळखही त्यांनी निर्माण केलेली आहे.

अमोल काकडे हे टप्प्याटप्प्याने ४८ गुंठ्यांत पपई घेतात. चार महिन्यांनी पपईची लागवड करतात. यासाठी १२ गुंठ्यांचे चार प्लॉट तयार केले. एका प्लॉटमध्ये २५० ते ३०० झाडांची लागवड केली जाते.

नऊ महिन्यांनी फळे लागतात. एका झाडाला ५० हून अधिक फळे लागतात. १८ महिने ती सुरू राहतात, सुरुवातीला पपई मार्केटला दिली जात होती.

मात्र, योग्य दर मिळत नसल्याने काकडे सहा वर्षांपासून मोठी बाजारपेठ असलेल्या विविध ठिकाणी नगावर विक्री करतात. फळाच्या आकारमानावरून दर ठरविला जात आहे.

सध्या ते आठवड्यातून दोनवेळा विक्रीसाठी पुणे येथे स्वतःच्या वाहनातून जातात. दरवर्षी नवीन रोपे, खते औषधोपचार, कामगारांची मजुरी, असा मिळून ४८ गुंठ्यांसाठी २ लाखांपर्यंत खर्च येतो. बाकी फायदाच होतो.

मागील काही वर्षांत तोट्याच्या शेतीमुळे खचून गेलो होतो. मात्र, स्वतः पपई फळाची दूरवर जाऊन विक्री केल्याने त्यातून चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. तसेच आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यास मदत झाली आहे. - अमोल काकडे, शेतकरी, तरडगाव

अधिक वाचा: आता पीएम किसानचा हप्ता मिळणार फक्त शेतकऱ्याच्या पत्नीला; काय आहे निर्णय? वाचा सविस्तर 

टॅग्स :शेतकरीशेतीपीकफलोत्पादनबाजारपुणेपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपीक व्यवस्थापन