Join us

थेट विक्रीचा होतोय फायदा; महिन्याला ५० ते ६० हजारांची कमाई करणाऱ्या इंजिनीअर शेतकऱ्याची वाचा यशकथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 14:47 IST

Success Story : तंत्रशुद्ध पद्धतीने पपईची शेती केल्यास अडीच एकरात महिन्याला ५० ते ६० हजारांची कमाई होते. हे इलेक्ट्रिकल इंजिनीअर असलेल्या व शेतीत नवनवे प्रयोग करणाऱ्या रूपेश बाळकृष्ण टांगले यांनी स्वअनुभवातून दाखवून दिले आहे.

योगेश घुमासे

भंडारा जिल्ह्यातील शेतकरी परंपरागत धान शेतीला फाटा देत नगदी पिकाकडे वळल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे खरीप बागायती पिकांचे क्षेत्र सातत्याने वाढत आहे.

त्यातच तंत्रशुद्ध पद्धतीने पपईची शेती केल्यास अडीच एकरात महिन्याला ५० ते ६० हजारांची कमाई होते. हे इलेक्ट्रिकल इंजिनीअर असलेल्या व शेतीत नवनवे प्रयोग करणाऱ्या रूपेश बाळकृष्ण टांगले यांनी स्वअनुभवातून दाखवून दिले आहे.

भंडारा शहरातील हनुमाननगर निवासी रूपेश टांगले यांची १२ एकर शेती जवाहरनगर परिसरातील लोहारा गावाशेजारील कन्हान व सांड नदीच्या खोऱ्यात आहे. खडीमिश्रित व उंचसखल रानमाळाला त्यांनी स्वकष्टातून शेतीयोग्य केले. निव्वळ धानाची शेती नफा देणारी नसल्याचे दिसून येताच ते नगदी पिकाकडे वळले.

शेतीला गावठी कोंबड्या व दुधाळ गीर गाईचे पालन अशा व्यवसायाची जोड दिली. सध्या त्यांच्या शेतात दीड एकरात ड्रीप व मल्चिंगवर वांगी, अडीच एकरात पपई, दोन एकरांत केळी, दोन एकरांत चारा पीक तर तीन एकरांत सागवानाची २२०० झाडे डौलाने उभी आहेत.

भंडारा शहरात दैनंदिन शेतमालाची विक्री

टांगले यांनी एक वर्षापूर्वी मार्चमध्ये एक हेक्टर क्षेत्रात ६ बाय ६ फूट अंतरावर एकरी ५०० पपई झाडांची लागवड केली. सध्या सण-उत्सवांच्या हंगामामुळे पपईला १५ ते २० रुपयांचा भाव मिळतो आहे. भंडारा शहरात दर आठवड्याला १ क्विंटलपेक्षा अधिक पपईची विक्री होत आहे. या विक्रीतून दरमहा ५० ते ६० हजारांचे उत्पन्न प्राप्त होत आहे, तर अन्य पिकांतून मजुरांचा खर्च भागत आहे.

तंत्रशुद्ध शेती काळाची गरज आहे. त्याचबरोबर शेतीला जोड व्यवसायाची साथ असणे आवश्यक आहे. त्यामुळे तरुणांनी शेतीकडे वळावे. स्वकष्टातून मोती पिकवावे. - रूपेश टांगले, प्रगतीशील शेतकरी, भंडारा. 

पपईवर रोग, सकाळची फवारणी लाभदायक

पावसाळ्यात पपईवर विविध रोगांचा प्रादुर्भाव जाणवतो. विशेषतः फळ धारणेच्या काळात पाने गुंडाळणारा रोग अधिक त्रासदायक ठरतो. यावर घरगुती उपाय न करता तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून आठवड्यातून दोनदा सकाळी केलेली फवारणी लाभदायक ठरत असल्याचे शेतकरी टांगले यांनी सांगितले.

दोन एकरांत केळी, शेवग्याची तयारी

टांगले यांनी एप्रिल महिन्यात दोन एकरात केळीची लागवड केली असून झाडे ७ ते ८ फुटांपर्यंत वाढली आहेत. सर्वच हंगामात शेवगा पीक फायदेशीर असल्याने त्यांनी एकरभर जागेत शेवगा पिकाची लागवड प्रस्तावित केली आहे.

हेही वाचा : शेतकऱ्याचा मुलाने उभारला कोट्यवधींचा उद्योग; प्रसंगी आईचं मंगळसूत्र गहाण ठेवलेल्या तरुणाची वाचा यशोगाथा

टॅग्स :शेतकरी यशोगाथाशेती क्षेत्रफलोत्पादनदुग्धव्यवसायकेळीशेतकरीशेतीबाजारविदर्भ