गोविंद कदम
पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घातल्यास शेतीतून विक्रमी उत्पादन घेता येते, याचा आदर्श नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील कारेगाव येथील प्रगतशील शेतकरी सुधाकर किरवले यांनी घालून दिला आहे. त्यांनी यंदा अवघ्या ५ एकर क्षेत्रात १६० ते १७० क्विंटल हळदीचे उत्पादन घेत कृषी क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
यंदाच्या हंगामात त्यांनी लोहा शहरातील एका कृषी सेवा केंद्राच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली हळदीची लागवड केली. पिकासाठी योग्य जमीन निवड, माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन, ठिबक सिंचनाचा वापर, तसेच कीड व रोग नियंत्रणासाठी वेळेवर फवारण्या या सर्व बाबींचे काटेकोर नियोजन करण्यात आले.
परिणामी हळदीच्या कंदाची वाढ जोमदार झाली असून दर्जेदार उत्पादन मिळाले आहे. सध्या सुरू असलेल्या काढणीच्या प्रक्रियेवरून ५ एकर क्षेत्रातून १६० ते १७० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.राजकीय आणि सामाजिक कार्यात सक्रिय असतानाही त्यांनी शेतीकडे दुर्लक्ष केले नाही.
एक 'कृषी अभ्यासक' म्हणून पिकांच्या गरजा ओळखून त्यांनी योग्य त्या उपाययोजना केल्या. बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज घेत पीक व्यवस्थापन केल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी यश मिळविले. सध्या शेती तोट्याची असल्याची धारणा अनेकांमध्ये आहे. मात्र, सुधाकर किरवले यांनी प्रयोगशीलतेच्या बळावर ही धारणा खोटी ठरवली आहे.
योग्य तंत्रज्ञान, नियोजन आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर शेती फायदेशीर ठरू शकते, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. यंदाचे वातावरण आव्हानात्मक होते; मात्र योग्य नियोजन आणि तज्ज्ञ मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाले.
शेणखतामुळे सुपीकता
प्रगतशील शेतकरी सुधाकर किरवले यांनी शेतीसोबत दुग्ध व्यवसायाची यशस्वी सांगड घालत आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्याकडे १५ जाफराबादी म्हशी असून, त्यातून मिळणाऱ्या दुधासोबतच शेणखतामुळे शेतीची सुपीकता वाढते आणि उत्पादनात भर पडते.
कृषी अधिकाऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन
लोह्याचे तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन आणि तांत्रिक सल्ल्यामुळेच हळदीच्या पिकात हे यश मिळवता आले, असे शेतकरी सुधाकर किरवले यांनी सांगितले.
