Lokmat Agro >लै भारी > Ashpak Mulani : शेतकऱ्याचा मुलगा २५व्या वर्षी बनला दिवाणी न्यायालयाचा न्यायाधीश

Ashpak Mulani : शेतकऱ्याचा मुलगा २५व्या वर्षी बनला दिवाणी न्यायालयाचा न्यायाधीश

Ashpak Mulani Farmer's son becomes civil court judge at the age of 25 | Ashpak Mulani : शेतकऱ्याचा मुलगा २५व्या वर्षी बनला दिवाणी न्यायालयाचा न्यायाधीश

Ashpak Mulani : शेतकऱ्याचा मुलगा २५व्या वर्षी बनला दिवाणी न्यायालयाचा न्यायाधीश

सलग तीन वर्ष त्याने एमपीएससी आणि यूपीएससीच्या माध्यमातून तीन पोस्ट मिळवल्या आहेत.

सलग तीन वर्ष त्याने एमपीएससी आणि यूपीएससीच्या माध्यमातून तीन पोस्ट मिळवल्या आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

सोलापुरातील शेतकऱ्याच्या कुटुंबातील एक मुलगा पुण्यात येतो. स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करतो आणि मागच्या तीन वर्षांत सलग तीन पोस्ट मिळवतो. युपीएससी आणि एमपीएससीच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध परिक्षेमध्ये तो पहिल्या प्रयत्नात पास होतो आणि वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी न्यायाधीश होतो. नाव आहे अश्पाक मुलानी. ही कहाणी आहे मोहोळ तालुक्यातील देवडी येथील शेतकऱ्याच्या मुलाची.

मोहोळ तालुक्यातील वाफळे व देवडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर अश्पाकने माध्यमिक शिक्षण देवडीतीलच महात्मा गांधी विद्यालयात घेतले. पुढे उच्च माध्यमिक शिक्षण नेताजी ज्युनिअर सायन्स कॉलेज, मोहोळ येथून पूर्ण केले. मुळात शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या अश्पाकचे आजोबा हे बोकड खरेदी-विक्रीचा व्यवसाय करायचे. त्याचे वडील हे प्राथमिक शाळेवर शिक्षक असून आई शेती करते. घरी दुधाचा जोडव्यवसाय आहे. अश्पाक हा त्याच्या आजोबांचा लाडका. 

आजोबाही नातवाचा लाड करायचे आणि म्हणायचे, "तू एक दिवस मोठा साहेब होणारेस, तू साहेब झाल्यावर या 'रसुल्याचा' नातू साहेब झाला म्हणून मी सगळ्या गावाला सांगणार आहे." आजोबांचे हे शब्द अश्पाकच्या मनावर कोरले गेले आणि आपल्याला आयुष्यात काहीतरी साध्य करायचंय हे त्याने मनोमनी ठरवून टाकलं. 

पुढे अश्पाकने पुण्यात येऊन स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासाला सुरूवात केली. मागील तीन वर्षांमध्ये सलग तीन परिक्षेमध्ये पहिल्याच परिक्षेत यश मिळवण्याचा मान त्याने मिळवला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२२ (जेएमएफसी) ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली. यामध्ये अश्पाकने राज्यात २३ वा क्रमांक घेऊन दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या पदाला गवसणी घातलीये.

अश्पाकने याआधीही तीन वेळा परिक्षेत यश मिळवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) झालेल्या मंत्रालय सहायक विधी अधिकारी गट-ब विधी व न्याय विभागाच्या परिक्षेत, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (‘यूपीएससी’च्या) माध्यमातून घेण्यात येणाऱ्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय विभागातील गंभीर फसवणूक तपास कार्यालयात सहाय्यक संचालक (एसएफआयओ) म्हणून देशात सातव्या क्रमांकाने निवड झाली होती. विशेष म्हणजे या पदावर विराजमान होणारा अश्पाक हा महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थी होता. याच पदावर तो सध्या हैद्राबाद येथे कार्यरत आहे.

शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेल्या अश्पाकने वयाच्या अवघ्या पंचविशीत मिळवलेले यश हे प्रेरणादायी आहे. माझ्या या प्रवासात कुटुंबियांची आणि ॲड. गणेश शिरसाट यांची साथ मिळाल्याचं अश्पाक सांगतो.

Web Title: Ashpak Mulani Farmer's son becomes civil court judge at the age of 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.