Join us

अंदोरीतील शेतकऱ्याला घेवड्याने केले लखपती; एकरात पावणेतीन लाखांचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 13:43 IST

सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागात उसाचे पीक सर्वाधिक घेतले जाते. मात्र, दीर्घ कालावधी, खर्च असल्याने अनेक शेतकरी पर्यायी पिकांच्या शोधात असतात.

राहिद सय्यदलोणंद : सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागात उसाचे पीक सर्वाधिक घेतले जाते. मात्र, दीर्घ कालावधी, खर्च असल्याने अनेक शेतकरी पर्यायी पिकांच्या शोधात असतात.

यातूनच अंदोरी येथील शेतकरी महादेव बापूराव धायगुडे यांनी वरुण अर्थात वाघ्या घेवडा पिकाचा यशस्वी प्रयोग केला.

वर्षभरात दोन हंगाम घेऊन आर्थिक बळकटीही निर्माण केली आहे. तसेच यावर्षी एक एकरमध्ये त्यांनी पावणे तीन लाखांचे उत्पन्न मिळवून इतरांपुढे आदर्श घालून दिला आहे.

अंदोरी (ता. खंडाळा) येथील महादेव धायगुडे यांनी यावर्षी एक एकर क्षेत्रात २५ किलो घेवडा बियाणे वापरून टोकन पद्धतीने लागवड केली होती.

बियाण्याची प्रक्रिया बुरशीनाशकाने करून घेतली. लागवडीनंतर २० दिवसांनी तणनाशकाची फवारणी करण्यात आली.

नियोजनबद्ध खतांचा डोस आणि तीन टप्प्यांतील फवारणीमुळे पीक जोमदार वाढले आणि शेंगांचीही मुबलक वाढ झाली. याशिवाय १५० किलो वाळके बियाणेही मिळाले.

सुमारे ४० हजारांचा खर्च वगळता तब्बल २ लाख ३१ हजार रुपयांचा निव्वळ नफा त्यांच्या हातात पडला आहे. अशा प्रकारे शेतकरी धायगुडे यांनी शेतीतील यश दाखवून दिले आहे.

६० दिवसांत पहिली तोडणी सुरू झाली. अखेरीस ३ हजार ४५२ किलो ओली शेंग उत्पादन मिळाले. बाजारभाव ५० ते ११० रुपयांपर्यंत मिळत राहिला. सरासरी ८० रुपये दर धरल्यास तब्बल २ लाख ७६ हजार रुपयांचे उत्पन्न झाले.

उसाच्या दीर्घकालीन पिकाला पर्यायी म्हणून घेवडा उत्तम ठरतो. कमी कालावधीत उत्पादन, कमी पाणी आणि सोपे कीड व्यवस्थापन ही या पिकाची वैशिष्ट्ये आहेत. बाजारपेठेत कायम मागणी असल्याने शेतकऱ्यांना खात्रीशीर दर मिळतो. - महादेव धायगुडे, शेतकरी, अंदोरी

अधिक वाचा: शेतरस्ते होणार आता कायमचे अतिक्रमणमुक्त; प्रत्येक रस्त्यासाठी मिळणार विशिष्ट नंबर

टॅग्स :शेतीशेतकरीपीकभाज्यापीक व्यवस्थापनबाजारऊस