Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला शेतीला कोहळा पिकाची जोड; एकरात पाच टन कोहळ्याचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 16:17 IST

अशिक्षित असूनही शेतीत प्रयोग करणारे कर्जत तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी अरुण वेहले यांनी यंदा १ एकर क्षेत्रात कोहळा हे पीक घेत पाच टन उत्पन्न घेतले. त्यांनी आता या कोहळ्यावर प्रक्रिया उद्योग करण्याचा मानस केला असून, कृषी विभागाकडे यासाठी प्रशिक्षणाची मागणी केली आहे.

कांता हावळेनेरळ: अशिक्षित असूनही शेतीत प्रयोग करणारे कर्जत तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी अरुण वेहले यांनी यंदा १ एकर क्षेत्रात कोहळा हे पीक घेत पाच टन उत्पन्न घेतले. त्यांनी आता या कोहळ्यावर प्रक्रिया उद्योग करण्याचा मानस केला असून, कृषी विभागाकडे यासाठी प्रशिक्षणाची मागणी केली आहे. कृषी विभागानेही त्यांना मदत करण्याचे ठरविले आहे. वेहले सध्या कोहळ्यापासून दीड लाख आणि इतर आंतरपिकांतून सुमारे तीन ते साडेतीन लाखांचे उत्पन्न घेत आहेत.

कर्जत तालुक्यातील माले या भागातील ते शेतकरी आहेत. त्यांची वडिलोपार्जित शेती आहे. भातशेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने, त्यांनी जोडशेती म्हणून टोमॅटोची शेती केली. मात्र, त्यातही त्यांना नुकसान सहन करावे लागले. दुधी, शिराळी, घोसाळी, पडवळ अशी भाजी लागवड ते करीत होते; पण, काहीतरी वेगळे करण्याची त्यांची अच्छा होती. त्यानुसार, त्यांनी बहुगुणी कोहळ्याचे पीक घेण्यास सुरुवात केली. साधारण १ एकर जागेत अरुण वेहले यांनी कोहळ्याच्या पिकाची लागवड केली. कोहळा हा साधारण भोपळ्याच्या जातीतला असल्याने तो वेलीवर लागतो. त्याला पीकही जास्त प्रमाणात येते.

सगळ्या संकटावर मात करून सेंद्रिय पद्धतीत वेहले यांनी कोहळ्याची शेती केली. त्यांच्या शेतात आजही वेलीवर ४ किलोचे फळ लटकलेले आहे. दसरा दिवाळी हा कोहळ्याचा हंगाम असतो. त्यामुळे या हंगामात तयार झालेल्या फळातून त्यांना एक ते दीड लाख एवढे उत्पन्न होते, तर इतर भाजीपाला आदीतून त्यांचे एकूण वार्षिक उत्पन्न हे साडेतीन लाखांच्या घरात आहे.

प्रक्रिया उद्योग का करावासा वाटला?पुनर्वाढ झालेल्या कोहळ्याला बाजारात दलाल, अडते यांच्याकडून १५ ते २० रुपयेच भाव येतो, तर बाजारात कोहळ्याची किरकोळ विक्री ही १०० रुपयांच्या वर होते. बाजारात किंमत कमी येत असल्याने, या कोहळ्यावर प्रक्रिया करून पेठा करून त्याची विक्री करण्याचे ठरविले आहे.

अरुण चेहले हे उत्तम काम करीत आहेत. त्यांना कृषी विभाग कायम मदत करतो. कोहळा शेती एकमेव वेहले यांनी केली आहे, त्यांनी कोहळ्यावर प्रक्रिया करण्याची इच्छा बोलून दाखविली आहे, मात्र, प्रशिक्षणासाठी किमान काही शेतकऱ्यांची आवश्यकता असते. कोहळा प्रक्रिया उद्योगासाठी अजून तरी जिल्ह्यातून कोणी शेतकरी पुढे आले नाही. त्यामुळे त्यांचे प्रशिक्षण होऊ शकले नाही. मात्र, प्रशिक्षण होऊन वेहले यांनी इतर शेतकऱ्यांना कोहळा शेतीचा आदर्श निर्माण करावा, यासाठी कृषी विभाग त्याच्यासोबत आहे. - ए. बी. गायकवाड, प्रभारी तालुका कृषी अधिकारी, कर्जत

टॅग्स :शेतकरीफळेबाजारदिवाळी 2023भाज्याकर्जतशेतीपीक