योगेश मोरे
उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मर्यादित संधींमुळे अनेक तरुण निराश होतात. मात्र, जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील मांडवा येथील नारायण चंद या तरुणाने शिक्षण, परिश्रम आणि आधुनिक शेती तंत्राचा संगम साधत यशाची अद्रक शेतीतून नवी वाट निर्माण केली आहे.
चंद यांने पाच वर्षे एमपीएससीची तयारी केली. मात्र अपेक्षित यश न मिळाल्याने त्याने नोकरीच्या मागे न लागता, परंपरागत शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. आज त्याच निर्णयाने त्यांचे आयुष्य बदलून टाकले आहे. एमपीएससीची तयारी सोडून शेतीकडे वळलेला तरुण यशस्वी शेतकरी म्हणून पुढे आला आहे.
नारायण चंद यांनी केवळ २ एकर शेतात आलं लागवड करून तब्बल १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. लागवडीपूर्वी जमिनीत युरिया, डीएपी आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा डोस दिला जातो. तसेच निंबोळी पेंड, कार्बोफेरम आणि ट्रायकोडर्मा यांसारखे जैविक उपाय वापरून अळी व कीड रोगांवर नियंत्रण मिळविण्यात देखील यश आले आहे.
बुरशीनाशकांचा योग्य वापर
सुरुवातीच्या टप्प्यात आलं पिकावर अळी आणि करपा रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला. यावर नारायण यांनी ॲन्टिबायोटिक आणि बुरशीनाशकांचा योग्य वापर करून नियंत्रण मिळवले. सड रोग रोखण्यासाठी त्यांनी कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली औषधे आणि ट्रायकोडर्मा वापरले. त्यांनी दोन वर्षापूर्वी घाणेवाडी जलाशयातील गाळ शेतात टाकला, ज्यामुळे जमिनीची सुपीकता मोठ्या प्रमाणात वाढली.
शेतीला बेभरवशाची म्हणून त्याकडे न बघता शेतीत रोज नवनवीन प्रयोग करणे गरजेचे आहे. मीदेखील तेच करीत आहे. त्यातून यश मिळतेच हा माझा विश्वास आहे. - नारायण चंद, युवा शेतकरी.