Join us

काजू खावी तशी चव लागणारी देशी शेंग; लक्ष्मीवाडीच्या शेतकऱ्यांचा भुईमूग लागवडीचा हटके पॅटर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 14:07 IST

लक्ष्मीवाडीच्या देशी शेंगांना इतकी मागणी आहे की, शेंगा काढायचा अवकाश, लगेच शेंगांची पोती विकली जातात. अनेकांना शेंगा मिळाल्या नसल्याने पुढच्या वर्षी शेंगा द्या. आताच आमचे बुकिंग घ्या, असे म्हणायची वेळ येते.

लक्ष्मीवाडीच्या देशी शेंगांना इतकी मागणी आहे की, शेंगा काढायचा अवकाश, लगेच शेंगांची पोती विकली जातात. अनेकांना शेंगा मिळाल्या नसल्याने पुढच्या वर्षी शेंगा द्या. आताच आमचे बुकिंग घ्या, असे म्हणायची वेळ येते.

माणुसकी अन् कष्टाच्या ना जिवावर इथले ग्रामस्थ गुण्यागोविंदाने आनंदी जीवन जगत आहेत. तर, शेतकऱ्यांनी इथल्या कोरडवाहू शेतीला नवी ओळख निर्माण करून दिली आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकविलेली देशी भुईमुगाची ख्याती सर्वदूर पसरली आहे.

जिभेवर दरवळत राहणारी काजू, खावी तशी चव लागणारी देशी शेंग ही इथल्या शेतीचं वैशिष्ट्य आहे. लक्ष्मीवाडीच्या देशी शेंगांना इतकी मागणी आहे की, नुसत्या शेंगा काढायचा अवकाश, तत्काळ शेंगांची पोती विकली जातात.

अनेकांना शेंगा मिळाल्या नसल्याने पुढच्या वर्षी आम्हाला शेंगा द्या. आताच आमचं बुकिंग घ्या, असे म्हणायची वेळ येते. ग्राहकांना येते चवीचा ब्रांड तयार झाला आहे. त्यामुळे इथल्या शेंगांचं नाव घेतले की, जिभेला रूचकर स्पर्श होतो.

सपाठ तसेच डोंगरात येथली शेती आहे. पाण्याच्या सिंचनाची कमतरता असल्याने कोरडवाहू क्षेत्र जास्त आहे. खरिपातच शेती अधिक फुलते आहे. मुरमाड शेतात पीक घेण्यात शेतकरी अव्वल राहिला आहे.

सेंद्रिय शेतीतून अर्थकारण अधिक भक्कम करण्याला शेतकरी प्राधान्य देतो. त्यातूनच भुईमूग सर्वात जात फुलतो. उत्पादनही चांगले देतो. त्यास दरही समाधानकारक मिळतो. त्यामुळे भुईमूग शेती ही आधार बनली आहे, जसा शेतकरी तसा शेतमजूर ही शेंगा तोडून त्याची विक्री करतो.

त्यामुळे शेतमालक आणि शेतमजूर हे दोघेही शेंगा विकतात, गावची लोकसंख्या दीड हजाराच्या आत आहे. त्यातील निम्म्याहून जास्त खातेदार शेतकरी आहेत. खरीप हंगामाचे क्षेत्र ५२० हेक्टर आहे. त्यामध्ये सोयाबीन, भुईमूग, कडधान्य, भाजीपाला पिके घेतली जातात.

३०० एकरांवर सेंद्रिय पद्धतीने देशी भुईमूग, तर १०० एकरात धनलक्ष्मी पद्धतीचा भुईमूग घेतला जातो. या शेतीला अनेक वर्षांची परंपरा आहे. पूर्णतः पावसाच्या पाण्यावर शेतीचा भरवसा आहे.

विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांची, तसेच औषधांची मात्रा दिली जात नाही. निव्वळ नैसर्गिक वातावरण, डोंगरातून पाण्यासोबत येणारा पाला पाचोळा, उन्हाळ्यात जनावरे शेतातून फिरतात, त्यापासून मिळणारी खते ही इथल्या शेतीची ऊर्जा आहे.

कसदार शेतीला निसर्गाचे वरदान लाभल्याने शक्यतो पिकावर किडीचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे पीक जोमदार आणि कमी नुकसानीची खात्री ही वैशिष्ट्ये आहेत. एक वर्ष आड भूईमूग पीक घेतले जाते.

मे महिन्यात रानाची नांगरट केली जाते. शेणखत टाकतात त्यानंतर रोटर मारून मशागत केली जाते. तिकटनेने समांतर रेषा मारतात. हमचौक करून दोन फूट अंतरावर घरचे बियाणे जूनच्या पहिल्या आठवड्यात टोकतात.

किमान चार वेळा कोळपणी केली जाते. भांगलन करून तण काढून टाकतात. जाळीचा विस्तार वाढलेला असतो. पसरट पद्धतीने पीक फुलते, त्यामुळे शेतजमिनीचा भाग झाकला जातो.

साडेचार महिन्यांनी शेंगा काढण्यास सुरुवात केली जाते. पन्नास ते साठ शेंगा लागतात आकाराने लहान, परंतु टच बियाणे भरलेले असतात. काढणीच्या वेळी रान टणक झालेले असते, त्यामुळे शेंगा उकरून काढाव्या लागतात. याचा त्रास होतो. मजुरांना जास्त पैसे द्यावे लागतात.

रोग कीडमुक्त बियाणांची जात असल्याने शेंगा खाताना थांबूच नये, असे वाटते. विशेष म्हणजे शेतजमिनीचा पोत चांगला आहे. माती परीक्षणातून १२ अन्न द्रव्ये तपासली जातात. त्यामध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण १७५ पर्यंत आढळून आले आहे. त्यामुळे उच्चतम प्रतीच्या शेंगा या एकरी चार क्विंटलपर्यंत निघतात.

या शेंगा शेतकरी १२ हजार रुपये क्विंटलप्रमाणे विकतात. त्यामुळे एकरी ४८ हजार रुपयांचे उत्पन्न निघते. सहा ऊन दिल्यानंतर पोती भरून ती विक्री केली जातात. म्हणजे, या गावात सेंद्रिय पद्धतीने देशी शेंगाचे १ हजार २०० क्विंटल उत्पादन निघून त्यापासून १५ लाख रुपयांचे उत्पन्न गावातील शेतकरी काढतात.

तांबडी माती मुरमाड जमीन आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होतो. नत्र, स्फुरद, पालाश यांचे प्रमाण अधिक उत्पादनासाठी पूरक आहे. मातीत चवीचा गोडवा आहे. उत्पादन वाढीची मुळातच ताकद जमिनीत आहे. त्यामुळे पिके जोमात येतात.

रासायनिक खते द्यावी लागत नाहीत. कीडीचा प्रार्दुभाव होत नाही. त्यामुळे कीटकनाशक फवारणी घ्यावी लागत नाही. शेंगातील बियाण्याचा रंग तांबूस असतो. तोंडात टाकताच त्याची चव भारी लागते.

कृषी विभागामार्फत गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. शेतीशाळा, प्रशिक्षण, चर्चा सत्र घेतले जाते. शास्त्रज्ञ यांची व्याख्याने ठेवली जातात. शेतकरी सहली आयोजन करून नावीन्य पूर्ण शेतीची माहिती दिली जाते. - महादेव जाधव, सहायक कृषी अधिकारी

शेंगांची शेती वर्षानुवर्षे केली जात आहे. पूर्वीपासून सेंद्रिय पद्धतीने देशी बियाणांचा वापर केला जात आहे. प्रत्येक शेतकरी भुईमूग पीक घेतो. आमच्या शेंगांच्या प्रतीची दखल शासनाने घेतली पाहिजे. बियाणे म्हणून आमच्याकडून खरेदी करण्याची व्यवस्था केली पाहिजे. - अण्णापा ढोल, शेतकरी

तीन एकरात शेंगा करतो. उत्पादन चांगले निघते. आरोग्याला हितकारक असल्याने शेंगांना मागणी जास्त आहे. मशागतीला जास्त खर्च येतो. पाहुण्यांना घरी आल्यानंतर गूळ शेंगा खायला दिल्या जातात. हा पाहुणचार अधिक गोडवा वाढविणारा ठरतो. हक्काने पाहुणे, मित्रसुद्धा शेंगा मागतात. गावाकडे जाताना त्यांना पिशवी भरून शेंगा दिल्या जातात. पाहुण्यांच्या घरातील सगळ्यांनाच त्यामुळे शेंगा खायला मिळतात. - कृष्णा ढोल, शेतकरी

आयुब मुल्लालेखक, 'लोकमत'चे खोची प्रतिनिधी आहेत.

अधिक वाचा: आटपाडीच्या यशवंतचे डाळिंब परदेशात रवाना; माळरानावरील ५०० झाडांनी दिले २५ लाखांचे उत्पन्न

टॅग्स :शेतीपीकशेतकरीकोल्हापूरसेंद्रिय शेतीपीक व्यवस्थापनखते