महेश घोलपजुन्नर तालुक्यातील रोहोकडी येथील शेतकरी अजिंक्य प्रभाकर मुरादे यांनी पारंपरिक पद्धतीने घेतलेल्या कांदा पिकात तीन वर्षांपासून म्हणावे असे उत्पन्न निघाले नाही. त्यामुळे १ एकर क्षेत्रात वांग्याचे बारटोक वाण लावले.
त्यापासून शेतकऱ्याला आर्थिक फायदा झाला आहे. त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे कांद्याने बुडवले पण वांग्याने तारले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अजिंक्य मुरादे यांना १ एकर क्षेत्र आहे. त्यात कमी जास्त करून क्षेत्रात कांदा या पिकाचे पीक घेतले; पण गेल्या तीन वर्षांपासून कांद्याला बाजारभाव मिळत नसल्यामुळे व कांद्याचे गळीत देखील कमी मिळत होते. त्यामुळे आपण दुसरे वेगळे पीक घेण्याबाबत विचार केला.
तसेच त्यांनी आपल्या शेतात बारटोक वाणाचे वांग्याचे पीक घ्यायचे ठरवले. यापूर्वी याच क्षेत्रात शिमला मिरचीचे पीक घेतले होते. त्याला बेड पाडून मल्चिंग, ठिबक, पाच फूट सरी होती.
तेच शिमला पीक संपल्यावर त्याच मल्चिंग पेपर व बेडवर अडीच फुटावर वांग्याची लागवड केली. त्याला एकरी ३ हजार काडी रोप लागले. जैविक खताचा, औषधाच्या फवारण्याचा वापर जास्त केला.
वांग्यावर येणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव येऊ नये म्हणून २० कामगंध सापळे लावले, लागवड केल्यानंतर ४५ दिवसात वांगी तोडायला आली. बायोप्राईम कंपनीचे अधिकारी केदार काळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
वांग्याची तोडणी ५ ते ६ दिवसांनी करावी लागते. आतापर्यंत २० टन उत्पादन मिळाले आहे. एकरी ४० टन उत्पादन मिळेल असा अंदाज आहे. सध्या किलोला ४० रुपये भाव मिळत आहे. पुढे बाजार नशिबाने वाढले तर या पेक्षा जास्त पैसे मिळू शकतात.
मी कॉम्प्युटर इंजिनिअर असून मी नोकरी करण्यापेक्षा शेती करण्याचे ठरवले होते. कारण नंतर वाटले की नोकरी करून फारसे पैसे मिळणार नाहीत. शेतीचे चांगले दर्जेदार पिकाचे उत्पन्न घेतले तर चांगले पैसे मिळतील; पण पहिल्यांदा कांदा पीक घेतल्यावर भांडवली खर्चही निघाला नाही.
नंतर कांदा पिकाला फाटा देऊन मी दुसरे पीक घेण्याचे ठरवले. आता मी वांगी पीक घेतले. त्यातून मला चांगले उत्पादन मिळून पैसे देखील मनासारखे मिळत आहेत. वडील, आई, पत्नी यांचे मोठे सहकार्य लाभले आहे.
योग्य काळजी घेतली म्हणून फायदा- या पिकाला योग्य पद्धतीने लक्ष दिले तर त्याचे वजन वाढते. वांग्याच्या चांगल्या वाढीसाठी पिकाला ३ दिवसातून दीड तास पाणी मात्रा दिली पाहिजे तरच पिकांची वाढ होते.- पीकवाढीच्या काळात पाण्याची कमतरता पडू देऊ नये. टप्प्याटप्प्यात उष्णता पाहून पाणी सोडले तर उत्पन्न वाढते. त्यामुळे आपला आर्थिक फायदा होतो असे मुरादे यांनी सांगितले.
अधिक वाचा: मुंबईला रामराम करत भाडेतत्त्वावर जमीन घेऊन केली शेती; आज सात एकर जमिनीचा मालक