Join us

ताडकळस येथील २२ वर्षीय पदवीधर तरुणाने भाजीपाला उत्पादनातून मिळविले नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:08 IST

Success Story : नोकरीपेक्षा शेतीतूनही मोठे पॅकेज मिळते हे पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील २२ वर्षीय पदवीधर शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. अवघ्या तीन महिन्यांत तीन एकर भाजीपाला लागवडीतून दीड लाखाचे उत्पन्न मिळविले. शिवाय तीन जणांना रोजगार दिला.

गजानन नाईकवाडे 

नोकरीपेक्षा शेतीतूनही मोठे पॅकेज मिळते, हे परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील २२ वर्षीय पदवीधर शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. अवघ्या तीन महिन्यांत तीन एकर भाजीपाला लागवडीतून दीड लाखाचे उत्पन्न मिळविले. शिवाय तीन जणांना रोजगार दिला.

ताडकळस येथील गंगाधर गोविंदराव आंबोरे या शेतकऱ्याला वडिलोपार्जित आठ एकर शेती आहे. त्यांचे आई-वडील सोयाबीन, कापूस, मूग, तूर, हरभरा आदी पारंपरिक पिकांची लागवड करतात; परंतु सध्या ही पिके किफायतशीर व जास्त उत्पन्न देणारी राहिली नाहीत. दरम्यान परभणी येथील एका महाविद्यालयात बीकॉमचे शिक्षण पूर्ण केलेल्या गंगाधरने शेतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.

ज्यात त्यांच्या मामाने स्वतःचा अनुभव व भाजीपाला लागवड करून इतरांना कसा रोजगार द्यायचा, याबद्दल सांगितले. मामाच्या मार्गदर्शनाखाली गंगाधरने तीन एकरमध्ये दोडके, वांगे, दिलपसंद व कहू लागवड केली. ज्यातून अवघ्या तीन महिन्यांमध्ये दोन टन वांगी, दीड टन दिलपसंद व जवळपास १२ हजार रुपयांचे कडू मिळून सव्वालाख रुपयाचे उत्पन्न काढले.

बाजारपेठेसह कार्यक्रमांना भाजीपाल्याचा पुरवठा

ताडकळस येथील आठवडी बाजार, पूर्णा तसेच परभणी येथील बाजारपेठेत भाजीपाला विक्रीसाठी नेला जातो. तसेच परिसरातील लग्न व इतर कार्यक्रमांनाही भाजीपाल्याचा पुरवठा मागणीनुसार करण्यात येतो.

महिलांनाही दिला रोजगार

मागील दीड महिन्यापासून भाजीपाला बाजारात नेण्यास सुरुवात झाली असून, त्यात भाजीपाला तोडणे, कॅरेटमध्ये भरणे व पिकांची निगा राखणे, यासाठी मागील दीड महिन्यापासून तीन महिलांना दररोजचा रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

.. जेणेकरून शेतकरी भरघोस उत्पन्न घेऊ शकेल!

दोडके, वांगे, दिलपसंद व कहू यातून उत्पन्न चालू आहे. त्यात आता मिरची, टोमॅटो, काकडीची लागवड केली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना पॉलिहाऊस द्यावे जेणेकरून शेतकरी भरघोस उत्पन्न घेऊ शकेल. - गंगाधर आंबोरे, शेतकरी.

हेही वाचा : जिद्दीला पेटला डी.एड धारक अन् तोट्याची शेती झाली फायद्याची; अमोदेच्या निवृत्तीरावांची वाचा 'ही' प्रेरणादायी कहाणी 

टॅग्स :शेतकरी यशोगाथाबाजारभाज्यापीक व्यवस्थापनमराठवाडाशेती क्षेत्रशेती