Join us

Success Story दोन एकर केशर आंबा बागेतून उच्चशिक्षित तरुणाला ८ लाखांचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 9:24 AM

संकटातून काढला मार्ग आज यशस्वी बाग व्यवस्थापन

नितीन कांबळे

पारंपरिक शेतीला फाटा देऊन अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रयोगातून यशस्वी प्रयोग करत असतात. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शिरापूर येथील युवा शेतकऱ्याने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर केशर आंब्याची बाग फुलवली आहे.

विशेष म्हणजे या तरुणाने महाविद्यालय जीवनामध्ये राज्यस्तरापर्यंत वकृत्व स्पर्धा गाजवल्या आहेत. एमएबीएडपर्यंत शिक्षण घेतले आहे. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी न लागल्यामुळे शेतीचा मार्ग पत्करला आहे.

शिरापूर येथील सावनकुमार तागड यांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन काही तरी नवीन प्रयोग करण्याचे ठरवले होते. २०१९ मध्ये त्यांनी बीड येथील नर्सरीतून ४०० केशर आंब्याची रोपे आणली. या काळात अनेक संकटे आली; पण योग्य नियोजन आणि कृषी सल्ला घेत त्यांनी बाग फुलवली.

गतवर्षी त्यांना ४ लाख रुपये उत्पन्न मिळाले. दुसऱ्या वर्षात फळ विक्रीला आले असून ८ लाख रुपये उत्पन्न निघेल, अशी तागड यांना अपेक्षा आहे.

संकटातून काढला मार्ग

■ यावर्षी मार्च, एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. गेल्या तीन वर्षापासून अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे तालुक्यात डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसला.

■ कधी रिमझिम तर कधी मुसळधार पावसाने डाळिंबाच्या बागावर तेल्या आणि मर रोगाने आक्रमण केले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बागेवर कुन्हाड चालवली.

■ मात्र, अशा परिस्थितीदेखील सावनकुमार तागड यांनी डाळिळंबाची बाग फुलवून दाखवली.

■ दरम्यान, सध्या बाजारात आंबा मोठ्या प्रमाणावर विक्रीस येत आहे. तागड यांनी सेंद्रिय पद्धतीने आणि गवतात आंबा पिकवून ग्राहकांना विकतात. त्यांनी घरीच शेतकरी ते थेट ग्राहक अशी विक्री सुरू केली आहे.

आम्ही शेतात यापूर्वी कापूस, तूर, कांदा पिके घेऊन बघितली. मात्र, पाहिजे तसे उत्पादन निघत नव्हते. पत्नी प्रगतीदेखील उच्च शिक्षित असून तिने शेतकामात रस दाखवला. त्यामुळे शेतात वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेत दोन एकरवर केशर आंबा लागवड केली. आंब्यातून यंदा ८ लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे. युवा शेतकऱ्यांनी १५,२० हजार रुपयांची नोकरी करण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास नक्कीच प्रगती होऊ शकते. - सावनकुमार तागड, शेतकरी.

हेही वाचा - Goat Farming अवकाळी संकटाच्या शेतीला देईल आधार; शेळी पालन हक्काचा रोजगार

टॅग्स :आंबाशेतकरीशेतीबीडमराठवाडाफळेबाजारशेती क्षेत्र