सोयाबीन पिकाची सुदृढ आणि निरोगी वाढ होण्यासाठी तसेच त्यापासून चांगले उत्पादन मिळण्यासाठी सुधारित वाणांची निवड, बियाण्याची गुणवत्ता महत्वाची आहे.
सोयाबीनपेरणीसाठी बियाणे निवड◼️ सोयाबीन पिकाची सुदृढ आणि निरोगी वाढ होण्यासाठी तसेच त्यापासून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी, पेरणीसाठी वापरावयाच्या बियाण्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक असते.◼️ सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्क्यांहून जास्त असेल तर बियाण्याची गुणवत्ता चांगली असते व अशा बियाण्यापासून अंकुरण होऊन उगवून आलेले रोप निरोगी व सुदृढ तयार होते.◼️ सोयाबीनचे बियाणे इतर पिकाच्या बियांपेक्षा खूप नाजुक असते त्यामुळे त्याची मळणी, हाताळणी व साठवणूक करताना खूप काळजी घ्यावी लागते, अन्यथा बियाण्याच्या पापुद्र्याला इजा पोचते व त्याची उगवण क्षमता कमी होते.◼️ त्यामुळे गुणवत्तापूर्ण बियाण्याची निवड पुढील हंगामातील पेरणीसाठी करणे आवश्यक असते.
शेतकर्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासणी का करावी?◼️ ऐन खरीप हंगामात सुधारित वाणांच्या बियाण्याचा तुटवडा आणि दरवर्षी बियाणे बदल यामुळे उत्पादन खर्चात वाढ होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते.◼️ जर शेतकर्यांनी उत्पादनातील छोटा हिस्सा पुढील हंगामात पेरणीसाठी राखून ठेवला तर त्यापासून उत्कृष्ठ पीक येऊन त्यापासून चांगले उत्पादन मिळू शकते.◼️ सोयाबीनच्या बियाण्याची गुणवत्ता ही हाताळणी आणि साठवणीच्या वेळी कमी होते.◼️ सोयाबीनच्या बियाण्याची गुणवत्ता कमी होण्याचे प्रमाण हे सोयाबीनचे वाण व साठवणुकीसाठी अवलंबविलेली पद्धत यांवर अवलंबून असते.◼️ बियाण्याची साठवण करताना योग्य ती सावधानता न बाळगल्यास जास्त नुकसान होते.◼️ बियाण्याच्या गुणवत्तेबद्दल प्राथमिक माहिती असल्यास शेतकरी असे बियाणे पेरणीसाठी वापरायचे की नाही याचा निर्णय स्वत: घेऊ शकतात.◼️ दरवर्षी पेरणीसाठी गुणवत्तापूर्ण बियाण्याची कमतरता भासते, त्यामुळे किमती बियाणे योग्य प्रमाणात पेरणीसाठी वापरले पाहिजे.◼️ बियाणे लॉटच्या गुवत्तेची पूर्व कल्पना असल्यास पेरणीसाठी योग्य बियाणे दर निश्चित करता येतो.◼️ बियाण्याच्या आकारानुसार मध्यम आकाराचे बियाणे असल्यास व बियाणे लॉटची उगवण क्षमता ७०% किंवा त्याहून जास्त असल्यास बियाणे दर प्रती हेक्टर ६२ ते ६५ किलो राखावा.◼️ जर बियाणे लॉटची उगवण क्षमता ७०% हून कमी असल्यास पेरणीसाठी प्रती हेक्टरी बियाणे दर वाढवावा.◼️ प्रत्येक एक टक्का उगवण क्षमता कमी झाल्यास शिफारस केलेल्या बियाणे दरामध्ये १ किलोने वाढ करून पेरणी करावी.◼️ परंतु शेतकरी स्वत:च्या अनुभवानुसार पेरणीसाठी क्षेत्राप्रमाणे बियाणे दर ठरवतात किंवा कमी/जास्त दराने पेरणी करतात.◼️ गुणवत्तापूर्ण व चांगली उगवण क्षमता असणारे बियाणे जास्त दराने पेरल्यामुळे किमती बियाण्याचे नुकसान होते व शेतामध्ये प्रती हेक्टरी जास्त रोपे उगवल्यामुळे पिकाची वाढ व्यवस्थित होत नाही तसेच किडी व रोगांचा प्रादुर्भाव इ. समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता तपासून योग्य दराने पेरणी करणे आवश्यक आहे.
- श्री. एस. ए. जायभाय (शास्त्रज्ञ ड-कृषि विद्यावेत्ता)अखिल भारतीय समन्वयित सोयाबीन संशोधन प्रकल्प, आघारकर संशोधन संस्था, पुणे
अधिक वाचा: बियाणे घरचे असो अथवा विकतचे, पेरणी अगोदर ही सोपी तपासणी कराच? वाचा सविस्तर