Join us

उन्हाळ्यात उसाच्या खोडवा पिकात होऊ शकतो चाबूक काणी रोगाचा प्रादुर्भाव; काय कराल उपाय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 15:31 IST

Usatil Chabuk Kani Rog ऊस पिकावर विषेशतः खोडवा पिकावर चाबूक काणी (Whip Smut) या रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

ऊस पिकावर विषेशतः खोडवा पिकावर चाबूक काणी (Whip Smut) या रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

सुरवातीला व्ही एस आय ८००५ व कोएम ०२६५ या जातीवर या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले. आता को. ८६०३२ या जातीवर देखील या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.

२० वर्षांपूर्वी ७४० व ८०११ या जाती याच रोगामुळं नामशेष झाल्या. भविष्यात आपणास देखील सतर्क राहून या रोगाचे व्यवस्थापन करणे अतिशय गरजेचे आहे.

चाबूक काणी रोगाबाबत काही महत्वाच्या बाबी- चाबूक काणी हा रोग युस्टिलॅगो सायटॅमिनी बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होते.- ऊसपीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत हा रोग दिसून येतो.- लागवड पिकापेक्षा खोडवा पिकात काणी रोगाचे प्रमाण जास्त आढळते.- खोडवा पिकाचा सुरुवातीचा काळ उन्हाळ्यात राहतो.- या काळात हवेतील व जमिनीचे तापमान वाढून रोगास पोषक वातावरण तयार होते. या रोगाचा प्रसार व प्रादुर्भाव जास्त होतो.

काणी रोगाची लक्षणे१) काणी रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या उसाच्या शेंड्यामधून चाबकासारखा चकचकीत चांदीसारखे पातळ आवरण असलेला व शेंड्याकडे निमुळता होत गेलेला पट्टा बाहेर पडतो. या पट्ट्यावरील आवरण तुटल्यानंतर आतील काळा भाग दिसतो, तो भाग म्हणजेच या रोगाचे बीजाणू.२) हे बीजाणू हवेद्वारे विखुरतात व निरोगी उसावर पडतात. अश्या पद्धतीने निरोगी उसावर या रोगाचा प्रादुर्भाव होतो.३) रोगामुळे उसाची पाने अरुंद व आखूड राहतात. अशा बेटातील ऊस कमी जाडीचे राहतात. कधी कधी खोडवा पिकात रोगग्रस्त बेटात जास्त प्रमाणात फुटवेदेखील आढळतात. उभ्या उसात रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कांड्यावरील डोळ्यातून काणीयुक्त पांगशा फुटतात.४) रोगग्रस्त बेटे कालांतराने वाळून जातात. त्यामुळे उसाचे उत्पादन व साखर उताऱ्यावर विपरीत परिणाम होतो.५) काणी रोगामुळे लागवडीच्या व खोडवा ऊस पिकाचे उत्पादन अनुक्रमे २९ ते ७० टक्क्यांपर्यंत घटल्याची नोंद आहे. साखर उतारादेखील ४ युनिटपर्यंत घटतो. रसाची शुद्धता घटते.

काणी रोगाचा प्रसार कसा होतो?हा रोग मुख्यत्वे प्रादुर्भावग्रस्त बेण्यामार्फत तसेच वारा, पाऊस, पाणी या द्वारे पसरतो.

चाबूक काणी रोगाचे व्यवस्थापन कसे कराल?◼️ प्रादुर्भावग्रस्त शेतातील ऊस बेण्यासाठी वापरू नये.◼️ प्रादुर्भावग्रस्त उसाचे कोंब कात्रीने किंवा विळ्याने कट करून अलगद पोत्यामध्ये भरावे.◼️ विळ्याने कापताना उसाचा पोंगा झडला जावून काजळी अन्य निरोगी उसावर पसरणार नाही याची काळजी घ्यावी.◼️ काणीयुक्त छाटलेले पोगे पोत्यासहित जाळून नष्ट करावेत.◼️ काणीचे फोकारे बाहेर पडण्यापूर्वी बेटांचे निर्मूलन झाले तर रोगाचा प्रसार कमी होण्यास मदत होते.◼️ याकरिता, प्रथम काणीयुक्त फोकारे प्लॅस्टीकच्या पोत्यात किंवा पिशवीत काढून घ्यावेत. नंतर बेटे काढावीत.◼️ प्रादूर्भावग्रस्त पोंग्यासाठी वापरलेली कात्री किंवा विळा निरोगी उसासाठी वापरू नये.◼️ मूलभूत बियाणे तयार करण्यासाठी उतिसंवर्धित रोपांचा पर्याय निवडावा.◼️ बेण्यास कार्बेन्डॅझिम बुरशीनाशकाची १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात कांडे प्रक्रिया करावी.◼️ उन्हाळ्यात ऊस पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये याची काळजी घ्यावी.◼️ १० टक्क्यांपेक्षा जास्त काणीचा प्रादुर्भाव असल्यास उसाचा खोडवा घेऊ नये.◼️ या रोगाचा प्रादुर्भाव अधिक दिसत असल्यास व्यवस्थापनासाठी अॅझॉक्सीस्ट्रॉबीन १८.२ टक्के अधिक या संयुक्त बुरशीनाशकाची १० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी घ्यावी.

प्रा. अजयकुमार सुगावेपिक संरक्षण (कीटकशास्त्र विभाग)कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली

अधिक वाचा: गाळ कसा तयार होतो? व त्याचे शेतीसाठी कसे फायदे होतात? वाचा सविस्तर

टॅग्स :ऊसपीककीड व रोग नियंत्रणशेतीपीक व्यवस्थापनशेतकरीपाणीतापमान