Join us

सततच्या पावसामुळे आंबा पिकातील ताण बसण्याच्या अडचणीवर काय कराल उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 15:13 IST

आंबा पिकास सततच्या पाऊसामुळे पाण्याचा ताण बसणे शक्य नाही. अशातच आंब्याला मोहोर येण्यासाठी झाडाच्या मुळांना ताण बसणे आवश्यक असते.

यावर्षी पावसाळा लांबला, अजूनही काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय. उशिरापर्यंतच्या पावसामुळे ऑक्टोबर हीट जाणवली नाही आणि आता अवकाळी पावसामुळे थंडीही सुरू झालेली नाही.

त्यामुळे आंबा हंगामाचे गणित बिघडणार असल्याची भीती बागायतदार व्यक्त करत आहेत. यंदाच्या हंगामात मार्चऐवजी एप्रिलमध्येच आंबा बाजारात येण्याची शक्यता अधिक आहे.

सद्यस्थितीत आंबा पिकाचे व्यवस्थापन

  • आंबा पिकास सततच्या पाऊसामुळे पाण्याचा ताण बसणे शक्य नाही. अशातच आंब्याला मोहोर येण्यासाठी झाडाच्या मुळांना ताण बसणे आवश्यक असते. यासाठी आंबा बागेतील झाडांच्या बुंध्यालगतच्या एक मिटर परिघातील गवत काढून अळ्यातील माती मोकळी करावी, आंबा बागेतील मोकळ्या जागेमध्ये उथळ अशी नांगरट करावी, बागेची साफसफाई लवकरात लवकर पूर्ण करावी जेणे करुन आंबा बागेतील जमिनीमध्ये असलेले पाण्याचे प्रमाण लवकर कमी होवून झाडाला ताण बसण्यास मदत होईल.
  • हापूस आंब्यामध्ये झाडांच्या टोकाकडील भागात जास्त पालवी, फांद्या असल्यास झाडांच्या आतील बाजूस सूर्यप्रकाश पोहचत नसल्याने नवीन पालवी आणि फळधारणेवर परिणाम दिसून येतो यासाठी गच्च झाडांची मध्य फांदीची छाटणी व काही घन फांद्याची विरळणी करावी. कापलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी.
  • वाढलेले प्रखर सुर्यप्रकाशाचे तास यामुळे आंबा पिकामध्ये पाण्याचा ताण निर्माण होऊन जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी आंबा पिकास पालवी येण्याची शक्यता आहे. शिवाय ढगाळ व दमट वातावरणामुळे आंब्याच्या नविन येणाऱ्या पालवीवर शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसुन येण्याची शक्यता असते. अशा वेळी पालवीचे सतत निरीक्षण करावे व प्रादुर्भाव दिसुन आल्यास किडग्रस्त शेंडे, काड्या काढुन अळीसह नष्ट कराव्यात.
  • पावसाची उघडीप मिळणार असल्यासच लॅम्डासायहॅलोथ्रिन ५% प्रवाही ६ मिली किंवा क्विनॉलफॉस २५% प्रवाही २५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. (सदर किटकनाशके लेबल क्लेम नाहीत.) फवारणी केलेले किटकनाशक पालवीवरती चिटकुन राहण्याकरीता व सर्वत्र पसरण्याकरीता किटकनाशकाच्या द्रावणात स्टीकर व स्प्रेडर मिसळून फवारणी करावी. 
  • आंब्यामध्ये नवीन पालवी आली असल्यास ढगाळ व आर्द्र वातावरणामुळे पालवीचे तुडतुडे किडींपासुन आवश्यकतेनुसार संरक्षण करावे. विद्यापिठाच्या शिफारशीत आंबा पालवी व मोहोर संरक्षणाच्या सुधारीत वेळापत्रकानुसार पहिली फवारणी २.८ टक्के प्रवाही डेल्टामेथ्रिन ९ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

अधिक वाचा: कोकणातील आंब्याचे अवेळी पाऊस व गारपीटीमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी विमा योजना

टॅग्स :आंबाकीड व रोग नियंत्रणपाऊसपीक व्यवस्थापनफलोत्पादनकोकण