आंबा फळाची काढणी आणि हाताळणी फार महत्त्वाची आहे. या प्रक्रियेत काही चुका झाल्या तर त्याचा परिणाम फळांवर होतो. यासाठी आंबा फळाची काढणी करताना उत्पादक शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे.
आंबा फळ काढणी व्यवस्थापन
- पावसाची शक्यता लक्ष्यात घेता ज्या ठिकाणी आंबा फळे काढणीस तयार झालेली असतील अश्या ठिकाणी आंब्याची काढणी झेल्याच्या सहाय्याने देठासह चौदा आणे (८५ ते ९० टक्के) पक्वतेला करुन घ्यावी.
- पाऊसामुळे आंबा फळावर करपा रोगाचे काळे डाग पडतात. अशावेळी फळांवर बुरशीनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे. बुरशीनाशकांची फवारणी न केल्यास काळे डाग वाढत जाऊन फळे पिकताना सडण्याची प्रक्रिया होऊ शकते. ज्या ठिकाणी आंबा काढणीकरीता १५ दिवस शिल्लक असतील अशा ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरीता कार्बेन्डॅझीम या बुरशीनाशकाची १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.
- दमट वातावरणामुळे काढणी केलेल्या आंबा फळावर फळकुज या रोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते, यामुळे फळे काढल्यानंतर फळांवर तपकिरी काळ्या रंगाचे चट्टे दिसुन फळे कुजतात आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होते. फळकूज नियंत्रणासाठी फळे काढणीनंतर लगेचच ५० अंश सेल्सिअस च्या पाण्यात १० मिनीटे बुडवुन काढावीत (उष्ण जलप्रक्रिया). अशी फळे खोक्यात भरावीत अथवा पिकण्यासाठी आडीत ठेवावीत.
- आंबा फळांची काढणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर करावी. उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने आंब्याची फळे काढल्यानंतर लगेचच सावलीमध्ये ठेवावीत. आंबा फळांची वाहतूक रात्रीच्या वेळेस करावी. आंबा वाहतुक भरदिवसा उन्हामध्ये वाहनांच्या टपावरुन करु नये.
- आंबा फळावर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसुन येण्याच्या शक्यता आहे. अश्या वेळी बागेमध्ये गळलेली फळे गोळा करुन नष्ट करावीत आणि आंबा फळांचे फळमाशीपासुन संरक्षण करण्यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेले फळमाशी रक्षक सापळे प्रति एकरी २ याप्रमाणात बागेमध्ये झाडाच्या खालील बाजुच्या फाद्यांवर लावावेत.
- आंबा फळांचे फळमाशी पासून तसेच प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच फळांचा आकार व वजन वाढून डाग विरहीत फळांसाठी, गोटी ते अंडाकृती आकाराच्या आंबा फळांना डॉ.बा.सा.कॉ.कृ.विद्यापीठाने दिलेल्या शिफारशी नुसार २५ x २० सें.मी. आकाराच्या कागदी/वर्तमानपत्रापासून बनविलेल्या पिशव्यांचे अवरण घालावे. आवरण घालताना फळाच्या देठाकडे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
अधिक वाचा: Farmer id : आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवरच काढा फार्मर आयडी; जाणून घ्या सविस्तर