गांडूळ खत काळाची गरज : भाग ०२ या मालिकेत आपण 'शेणखताला दर्जेदार कुजविण्यासाठी गांडूळ निवडायचे आहेत; मग 'या' गोष्टी विसरू नका बरं' या मथळ्याखाली गांडूळ निवड करतांना काय काळजी घ्यावी; गांडूळ खत निर्मितीच्या विविध पद्धती आदींची माहिती जाणून घेतली.
आजच्या या भागात आपण गांडूळ खत निर्मितीची सुलभ पद्धत कोणती? गांडूळखत निर्मितीसाठी लागणारे खाद्य, जागेची निवड, निकष, गांडूळखतात असलेले अन्नद्रव्याचे प्रमाण, उच्च प्रतीचे गांडूळखत कसे ओळखावे आदींची सविस्तर माहिती घेणार आहोत.
शेतकऱ्यासाठी अल्प खर्चाची व सुलभ अशी पद्धत कोणती
खड्डा पद्धत हि शेतकऱ्यांसाठी अल्प खर्चाची व सुलभ अशी पद्धती आहे. या पद्धतीत सुरुवातीला ३ मी. लांब, २ मी. रुंद, ०.६ मी. खोलखड्डा करून तळाशी अर्धा फुट (१५ सेमी.) जाडीचा सेंद्रिय पदार्थांचा (गव्हाचे काड, उसाचे पाचट, सोयाबीन, तूर, सुर्याफुलांचा भुसा, पालापाचोळा, चाऱ्याचा उरलेला भाग इत्यादी) थर द्यावा.
त्यावर अर्धवट कुजलेले शेणखत व चाळलेली माती ३:१ या प्रमाणात मिसळून त्यांचा अर्धा फुट (१५ सेमी.) चा थर द्यावा. त्यावर ताज्या ताज्या शेणाचा किंवा पाण्यामध्ये शेण कालवून त्याची रबडी करून १० सेमी.चा तिसरा थर द्यावा.
शेवटी बिछान्यावर सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन घालावे. हा बिछाना पाण्याने ओला करावा. वातावरणानुसार व आवश्यकतेप्रमाणे पाणी द्यावे व खतामध्ये ओलावा टिकून राहील याची काळजी घ्यावी. सर्वच पद्धतीमध्ये थरांची रचना सर्वसाधारण एकसारखीच आहे.
साधारणतः रचलेल्या थराची उष्णता कमी झाल्यावर एक ते दोन आठवड्यांनी सेंद्रिय पदार्थांचा थर बाजूला सारून कमीतकमी १००० प्रौढ गांडूळे सोडवीत. खड्ड्यात गांडूळाची संख्या १००० झाली कि दोन महिन्यात उत्तमासे १ टन गांडूळखत तयार होते. गांडूळाची संख्या कमी असेल तर तयार होण्यास जास्त काळ लागतो.
गांडूळखत निर्मितीसाठी लागणारे खाद्य
• शेतातील पालापाचोळा, शेणखत, जनावरांच्या गोठ्यातील उष्णवळ, अर्धवट कुजलेले इतर सेंद्रिय पदार्थ, स्वयंपाक घरातील उरलेल्या भाजीपाल्याचे अवशेष हे सर्व पदार्थ गांडूळाचे खाद्य म्हणून वापरण्यात येते.
• परंतु हे वापरण्यापूर्वी शक्य तेवढे लहान तुकडे करावे. ते एकत्रित साठवून त्यावर पाणी मारून कुजू द्यावे व सहा ते आठ दिवसांनी त्यातील गरमपणा नष्ट झाल्यावर गांडूळखत निर्मितीस वापरावे.
गांडूळखत निर्मितीसाठी नेमकी जागेची निवड व निकष
गांडूळखत निर्मितीची जागा गुरांच्या गोठ्याजवळ उंच जागेवर योग्य निचरा असणाऱ्या ठिकाणी मांडवाच्या किंवा झोपडीच्या सावलीत करण्यात यावा. ज्यामुळे खतांचे व गांडूळाचे उन्हापासून व पावसापासून संरक्षण होईल.
गांडूळखत गांडूळापासून वेगळे करायाची पद्धती
• गांडूळखत तयार झाले कि पाणी देणे बंद करायचे. वरचा थर कोरडा झाला कि पूर्ण गांडूळासहित बाहेर काढावेत व बाहेर सूर्यप्रकाशात ताडपत्रीवर किंवा गोणपाटावर शंकूच्या आकाराचा ढीग करावा. उन्हामुळे सर्व गांडूळे ३-४ तासानंतर तळाशी जाऊन बसतील.
• नंतर वरचा खतांचा भाग हलक्या हाताने अलग करून घ्यावा. त्यामध्ये कुजलेले गांडूळखत तसेच गांडूळाची अंडी, गांडूळे परत खड्ड्यात सोडवीत. गांडूळखत वेगळे करतांना टिकाव, कुदळ , फावडे इ. चा वापर टाळावा.
गांडूळखतात अन्नद्रव्याचे प्रमाण
• गांडूळखतातील अन्नद्रव्याचे प्रमाण हे मुख्यत्वे गांडूळखत निर्मितीकरिता वापरण्यात आलेल्या सेंद्रिय पदार्थातील अन्नद्रव्याच्या प्रमाणावर किंवा शेणाच्या वापरावर अवलंबून असते. परंतु एवढे मात्र निश्चित आहे कि, गांडूळखतातील अन्नद्रव्याच्या तुलनेने अधिक असते.
• प्रमाण:नत्र ०.५ ते १.६, स्फुरद ०.३ ते २.३, पालाश ०.१५ ते ०.५०.
उच्च प्रतीचे गांडूळखत कसे ओळखावे
• गांडूळखत शेतकऱ्यांनी शक्यतो घरचे घरीच तयार करावे असे अपेक्षित आहे. परंतु हल्ली बऱ्याचशा कंपन्या किंवा उद्योजक व्यापारी तत्वावर गांडूळखताची निर्मिती करतात व नंतर आकर्षक पेकिंगमध्ये विक्रीस ठेवतात.
• यात शेतकऱ्याची फसवणूक होते म्हणून चांगल्या प्रतीच्या गांडूळखताची ओळख होणे गरजेचे आहे.
• चांगले गांडूळखत कणदार, चहापत्तीसारखे गडद तपकिरी रंगाचे, घाणवासविरहीत असून हाताला चिकटत नाही.
• पावसाच्या पहिल्या सरीनंतर मातीतून निर्मित होणाऱ्या आल्हाददायक मृदगंधासारखा सुगंध, उत्कृष्ट गांडूळखतापासून येतो.
• चिमुटभर गांडूळखत काचेच्या ग्लासात पानी भरून त्यात टाकले असता ते पाण्यावर तरंगते.
• त्यात जर मातीची भेसळ असेल तर त्यातील माती दोन तीन मिनिटातच ग्लासच्या तळाशी जाते. त्यावरून गांडूळखतातील मातीच्या भेसळीचे प्रमाण लक्षात येते.
क्रमश:
डॉ. श्रीकांत मोहन खुपसे
सहाय्यक प्राध्यापक
एमजीएम, नानासाहेब कदम, कृषी महाविद्यालय, गांधेली, छ संभाजीनगर.
डॉ. व्ही. जी. अतकरे
सहयोगी अधिष्ठाता,
कृषी महाविद्यालय, नागपुर.