खताच्या कार्यक्षम आणि समतोल वापरासाठी माती परीक्षण की आवश्यक बाब आहे. जमिनीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्यांचा साठा लक्षात घेऊन त्यानुसार खताचा वापर केला तर दिलेल्या खताचा योग्य मोबदला मिळू शकतो.
मात्र माती तपासणी करताना ज्या शेतातील मातीची तपासणी करायची आहे. त्या शेतातील मातीचा नमुना शेतातून कसा घ्यावा यासोबत तो परीक्षण केंद्रावर नेताना कसा घेऊन जावा हे देखील देखणे बघणे अत्यंत गरजेचे आहे.
ज्यामुळे आपल्या माती परीक्षणाचा तपासणी अहवाल हा अचूक येऊन त्याद्वारे आपल्याला योग्य माहिती मिळू शकते. याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत मातीचा नमुना कसा घ्यावा.
मातीचा नमुना 'असा' घ्यावा
१) जमिनीची एकरूपता, रंग, सुपीकता, उंच-सखलपणा इ. लक्षात घेऊन वेगवेगळे गट पाडावेत.
२) प्रत्येक गटातून ५-१० ठिकाणाहून २२.५ से.मी. खोलीपर्यंत गिरमीट, फावडे किंवा खुरपीच्या साह्याने मातीचा नमुना घ्यावा. तर फळ पिकांसाठी एक मिटर खोलीपर्यंतची मातीचा नमुना घ्यावा.
३) फावडे किंवा खुरपीच्या साह्याने मातीचा नमुना घेताना प्रत्येक ठिकाणी २२.५ से.मी. खोल 'व्ही' आकाराचा खड्डा करावा त्या खड्ड्याच्या तळापासून पृष्ठभागापर्यंत सारख्या जाडीचा मातीचा थर जमा करावा.
४) सुमारे ५-१० ठिकाणाहून घेतलेले नमुने एकत्र मिसळावे / एकत्रित करावेत त्यातून अंदाजे अर्धा ते एक कि.ग्रॅ. माती सावलीत सुकवून प्लॅस्टिकच्या अथवा कापडी पिशवीत भरावी.
नमुना घेताना 'हे' लक्षात असू द्या
१) मातीचा नमुना साधारणपणे पिकाची कापणी झाल्यावर, परंतु नांगरणीपुर्वी घ्यावा. शेतात पीक असल्यास दोन ओळीतील जागेतून नमुना घ्यावा.
२) विहिरी आणि बांधाच्या अथवा कालव्यालगतीची जागा, शेणखत व कचरा टाकण्याची जागा आणि जनावरांच्या गोठ्यालगतच्या जागेवरील माती नमुन्याकरिता घेण्याचे टाळावे.
३) जमिनीत रासायनिक खते टाकली असल्यास दोन अडीच महिन्याच्या आत मातीचा नमुना घेऊ नये.
४) विविध प्रकारच्या जमिनीचे अथवा निरनिराळ्या शेतातील नमुने एकत्र मिसळू नये.
५) मातीचा नमुना घेण्यसाठी अथवा साठवण्यासाठी रासायनिक खताच्या पिशव्या वापरू नयेत.
६) सुमारे ५-१० ठिकाणची माती एका प्रतिनिधिक नमुन्याकरिता एकजीव करणे अत्यंत आवश्यक आहे.
हेही वाचा : जमिनीखालील अवशेषाचे झालेले खत पिकांसाठी भारी; अधिक उत्पादनाची बात न्यारी