Join us

यंदा जमिनीची नांगरणी करतांना वापरा 'ही' पद्धत; उत्पादन वाढून शेतीला होणार फायदे

By रविंद्र जाधव | Updated: April 27, 2025 15:09 IST

शेती ही आपल्या देशाची मुख्य जीवनरेखा आहे. पाऊस पडल्यावर खरीप हंगामात विविध मुख्य पिके घेत शेतकरी बांधव आपला उदरनिर्वाह चलवितात. ज्यासाठी उन्हाळ्यात शेतजमिनीची नांगरणी केली जाते. सध्या राज्यात सर्वत्र नांगरणी हंगाम सुरू आहे.  

शेती ही आपल्या देशाची मुख्य जीवनरेखा आहे. पाऊस पडल्यावर खरीप हंगामात विविध मुख्य पिके घेत शेतकरी बांधव आपला उदरनिर्वाह चलवितात. ज्यासाठी उन्हाळ्यात शेतजमिनीची नांगरणी केली जाते. सध्या राज्यात सर्वत्र नांगरणी हंगाम सुरू आहे.  

चांगले उत्पादन मिळवण्यासाठी जमिनीची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. ज्यासाठी विशेषतः उतार असलेल्या जमिनीमध्ये पावसाचे पाणी वाहून न जाता जमिनीत मुरणे आवश्यक असते. यासाठी आडवी नांगरणी ही पद्धत फारच उपयुक्त ठरते. 

आडवी नांगरणी म्हणजे काय?

आडवी नांगरणी म्हणजे उताराच्या उलट दिशेने म्हणजे जमिनीच्या उताराला आडवी, समांतर रेषेत नांगरणी करणे. जेव्हा अशा प्रकारे जमीन नांगरली जाते, तेव्हा पावसाचे पाणी थेट खाली वाहून न जाता थांबले जाते आणि जमिनीत मुरते.

या पद्धतीमुळे काय फायदे होतात

शेत जमिनीची आडवी नांगरणी केल्यास विविध फायदे जाणवतात. ज्यात जमिनीची धूप कमी होते, पाणी मुरते, निचरा वाढतो यासोबत आणखी देखील काही फायदे होतात. जाणून घेऊया याच फायद्यांविषयी सविस्तर माहिती.  

जमिनीची धूप कमी होते

उताराच्या दिशेने नांगरणी केल्यास पावसाचे पाणी मोकळेपणाने वाहते आणि बरोबर मातीही वाहून जाते. पण आडवी नांगरणी केल्यास पाण्याचा प्रवाह अडवला जातो, ज्यामुळे माती वाहून जात नाही. त्यामुळे जमिनीची धूप कमी होते आणि मातीचा पोत टिकून राहतो.

पाणी जमिनीत मुरते

पाणी थांबल्यामुळे ते हळूहळू जमिनीत मुरते. याचा थेट फायदा म्हणजे पिकांना योग्य प्रमाणात ओलावा मिळतो. त्यामुळे सिंचनाची गरज कमी होते.

निचरा शक्ती वाढते

नांगरणीमुळे मातीची रचना फुलवली जाते आणि जमिनीत हवा खेळती राहते. यामुळे पावसाचे किंवा सिंचनाचे अतिरिक्त पाणी सहजपणे मुरते, आणि जमिनीत पाणी साचून राहत नाही.

सेंद्रिय पदार्थांचे विघटन

जमिनीत ओलावा टिकल्याने सेंद्रिय पदार्थांचे विघटन चांगले होते. विघटन झाल्यामुळे तयार झालेले अन्नद्रव्य पिकांना सहज मिळते. त्यामुळे पीक वाढ चांगली होते.

तण नियंत्रण

नांगरणी करताना तण उखडले जातात परिणामी काही अंशी तण नष्ट होतात. त्यामुळे पिकांना अन्न, पाणी अधिक मिळते.

हेही वाचा : जमिनीच्या गुणधर्मांची माहिती जाणून घेण्यासाठी शेतातील माती का अन् कशी तपासावी? वाचा काय सांगताहेत तज्ञ

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीलागवड, मशागतपीक व्यवस्थापनखरीप