भाजीपाला पिकांत रसशोषक किडी व फळ पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे ३० ते ४० टक्के नुकसान होऊ शकते.
त्याशिवाय रासायनिक कीटकनाशकांचा अनावश्यक वापर केल्यास भाजीपाल्यावर कीटकनाशकांचा अंश राहू शकतो व त्याचे दुष्परिणाम होतात. त्यामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पिकाच्या सुरवातीपासून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा.
मिरची या पिकात फळ पोखरणारी अळी, फुलकिडे, पांढरी माशी, कोळी इत्यादी किडी मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. यासाठी सोपे आणि कमी खर्चाचे उपाय पाहूया
असे करा जैविक उपाय:
- मिरची हे पीक विविध किडींना फार संवेदनशील असल्यामूळे अगदी रोपवाटीकेपासून ते रोपलागवडीच्या नंतर शेवटच्या तोडणीपर्यंत निरनिराळ्या टप्प्यात काळजी घेणे आवश्यक आहे.
- मिरचीच्या रोपावर हलकेसे पाणी शिंपडल्यास फुलकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
- पिकाची फेरपालट करावी. सलग फक्त मिरचीचे पीक घेणे टाळावे.
- मिरची पिकासोबत ४:१ या प्रमाणात चवळी, कोथिंबीर यांचे आंतरपीक घ्यावे.
- झेंडू या सापळा पिकाची ४५ दिवसाची रोपे १०० झाडे प्रति एकरी लावावीत.
- कीडग्रस्त फळे तोडून आतील अळीसह नष्ट करावे, तसेच शेत तणमुक्त ठेवावे.
- पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी १०-१२ पिवळे चिकट सापळे व फुलकिड्यांसाठी निळे १०-१२ चिकट सापळे प्रति हेक्टरी लावावेत.
- फळ पोखरणाऱ्या अळीच्या सर्वेक्षणासाठी ५ कामगंध सापळे प्रति हेक्टरी लावावेत.
- शेतात पक्षांना बसण्यासाठी एकरी १० पक्षीथांबे लावावेत जेणेकरून पक्षी त्यावर बसून अळ्या टिपून खातील.
- सुरवातीच्या अवस्थेत रासायनिक किटकनाशकाचा वापर टाळावा. त्यामुळे ढालकिडा, क्रायसोपा, सिरफिड माशी, भक्षक ढेकूण या मित्र कीटकांचे संरक्षण होऊन हानिकारक किडीचे नैसर्गिकरित्या व्यवस्थापन होईल.
- फळ पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोग्रामाची अंडी ५०००० प्रति हेक्टरी शेतामध्ये सोडावीत (३ ते ४ ट्रायकोकार्ड).
- फळ पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी एचएएनपीव्ही २५० एलई ५ मिली प्रति १० लिटर पाण्यातून सायंकाळी फवारणी करावी.
- पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅझाडीरॅक्टीन ३०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
- वातावरणात आर्द्रता असल्यास बिव्हेरिया बॅसियाना १ टक्के डब्ल्यूपी १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.
- रासायनिक कीटकनाशकाची फवारणी किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर वारंवार एकाच कीटकनाशकाची फवारणी न करता आलटून पालटून करावी.
अधिक वाचा: Ranbhaji Mahotsav : पौष्टिक भाज्यांबाबत लोकांना जागरुक करण्यासाठी रानभाजी महोत्सव