कोल्हापूर जिल्ह्यात ऊस हे सर्वात महत्त्वाचे जगदी पीक आहे. एखाद्या जमिनीमध्ये ज्यावेळी बहुवार्षिक नगदी पिके घेण्यास सुरुवात होते, त्यावेळी निसर्गाने त्या जमिनीला जी नैसर्गिक सुपिकता दिलेली असते, तिच्या जिवावर पहिली १५-२० वर्षे पिके चांगली येतात, त्यानंतर उत्पादन पातळी घटत जाते.
ऊस शेतीला सुरुवात होऊन आता ५०-६० वर्षे झाली. सुरुवातीला जे उत्पादन मिळत होते, ते १५-२० वर्षानंतर मिळेनासे झाले. शेतकऱ्यांना यावर योग्य मार्गदर्शन मिळाले नाही. उत्पादन पातळी टिकविण्यासाठी त्याने रासायनिक खते जास्त वापरण्याचा चुकीचा मार्ग अवलंबिला.
शेतीतून योग्य उत्पन्न मिळेनासे झाले. तरी, दुसरे सोयीचे पीक नसल्याने उसाची शेतीच चालू आहे. या मुख्य अडचणीबरोबर इतर अनेक अडचणींना शेतकरी समाजाला सामोरे जावे लागते. यावर काही उपाय आहेत की नाही?, तर उपाय आहेत. ते उपायच या मालिकेतून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहोत.
प्रथम १५-२० वर्षांनंतर उत्पादन नेमके कोणात्या कारणाने घटते, यावर आपण शास्त्रीय अभ्यास करणार आहोत. या संबंधित आणखी एका संदर्भाचा अभ्यास करणार आहोत. अमेरिकेत एका उत्तम वाढलेल्या जंगलात नत्र कसा कसा, कोठे-कोठे साठविला गेला आहे, याचा अभ्यास केला.
या अभ्यासात असे दिसून आले की, ९१ टक्के नत्र जमिनीवरील मृत सेंद्रिय पदार्थात आहे. मृत सेंद्रिय पदार्थ म्हणजे जंगलात होणारी पानगळ, काही मृत फांद्या जमिनीवर पडतात. काही वनस्पती प्राणी खातात, त्यांचे मलमूत्र व मृत शरीर ते कुजून तयार होणारे सेंद्रिय खत वगैरे.
हे वर्षानुवर्षे व पृष्ठभागावर साठत जाऊन याचा एक थर तयार होतो. यात नत्र साठलेला असतो. ८.५ टक्के नत्र जिवंत वनस्पतीत साठलेला असतो, तर केवळ ०.०५ टक्के नत्र बिगर सेंद्रिय मातीत असतो.
बिगर सेंद्रिय माती म्हणजे समजून घेऊ खडक झिजून जी माती तयार होते, त्याला खनिज माती म्हणता येईल, वनस्पती व प्राण्यांचे अवशेष कुजून तयार झालेली सेंद्रिय माती, खनिज मातीच्या कणाचे प्रमाण ९९.५ टक्के असते, तर फक्त ०.५ टक्के सेंद्रिय माती असते.
याचा अर्थ असा की, ९१ टक्के म्हणजे खूप मोठा नत्राचा भाग या ०.५ टक्के मातीतच आहे, तर फक्त ०.५ टक्के नत्र या ९९.५ टक्के मातीत आहे. नत्राव्यतिरिक्त इत्तर कोणत्याही वनस्पतीच्या अन्नद्रव्याचा अभ्यास केल्यास त्याचेही प्रमाण नत्राप्रमाणेच जवळपास सापडेल.
मी हरितक्रांतीच्या सुरुवातीच्या काळात शेतीला १९७० साली सुरुवात केल्याने मला ही सर्व स्थित्यंतरे अनुभवायला मिळाली कुटुंबाचे संपूर्ण अर्थशास्त्र शेतीवरच अवलंबून असल्याने १९८५-९० च्या दरम्यान या संकटाने मला हैराण केले.
मी शेती पदवीधर असल्याने त्यावरील उपाय शोधण्याचे आव्हान स्वीकारले व शेतीवरील शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास करण्यास या संकटाने प्रवृत्त केले. अभ्यासातून मार्ग सापडत गेले व या संकटातून अभ्यासाने मला सावरले व परत स्थिरस्थावर केले.
रासायनिक खतांचा अधिक डोस हा पर्याय नाही१) रासायनिक खतांचे जास्त डोस देणे हा यावर पर्याय होऊच शकत नाही. आता सेंद्रिय पदार्थांची टक्केवारी धोक्याच्या पातळीखाली गेली आहे. यामुळे उत्पादन पातळी घटत चालली आहे. यावर सेंद्रिय खतांचा वापर करणे हाच एकमेव मार्ग, अनादी काळापासून सेंद्रिय खत जमिनीला देण्याचा मार्ग म्हणजे शेण व गदाळ्यापासून तयार झालेते खत, म्हणजे शेणखत व कंपोस्टचा वापर करणे.२) शेतीची सर्व कामे, माल वाहतूक व प्रवासी वाहतूक सर्व बैलांमार्फत चाले. त्याकाळात बैल, गाई, म्हशी मोठ्या प्रमाणात पाळल्या जात. फक्त पावसाळी पीकच बहुतेक ठिकाणी घेतले जाई. जाती पारंपरिक जुन्या होत्या. त्यांचे उत्पादनही मर्यादित होते. यातून मर्यादित सेंद्रिय कर्बाचा वापर केला जाई. शेणखत भरपूर उपलब्ध होते. त्याचाही वापर केला जाई. तोपर्यंत उत्पादन घटीचा प्रश्न उभा राहिला नाही. पुढे यांत्रिकीकरण व सुधारित शेती पद्धतीत एका बाजूला सेंद्रिय कर्बाचा वापर वाढला.
सेंद्रिय मातीतून पिकांना अन्नपुरवठा होतो• वनस्पती किंवा आपल्या शेतीतील पिकांचे अन्नद्रव्य व्यवस्थापन या ०.५ टक्के सेंद्रिय मातीमार्फतच चालते. बाकी ९९.५ टक्के माती ही पिकाला फक्त उभे राहण्यासाठी आधार देणारी असते. पिकाला सेंद्रिय मातीतूनच अन्नद्रव्ये मिळतात.• पिकाला या सेंद्रिय पदार्थांचा वापर करून जमिनीला डोळ्याना न दिसणारे प्राणी अन्नपुरवठा करतात. या कामात सेंद्रिय कणांचा वापर करून तो संपत जातो, हरित क्रांतीत आपण सुधारित जाती, रासायनिक खते वापरून उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जास्त वेगाने सेंद्रिय कर्ब वापरून संपविला.• निसर्गाने दिलेल्या मूळ साठ्याच्या जिवावर याकडे दुर्लक्ष झाले, तरी १५- २० वर्षे पिकाचे उत्पादन बऱ्यापैकी मिळते. पुढे ते कमी कमी होत जाते. कमी होण्याचा वेग शेतकऱ्यांच्या ध्यानात येत नाही.
- प्रताप चिपळूणकर कृषीतज्ञ, कोल्हापूर