Join us

अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकावर किड व रोग प्रादुर्भावाची शक्यता; कसे कराल व्यवस्थापन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 17:31 IST

सद्यस्थितीमध्ये कोकण विभागामध्ये पावसाळी ढगाळ वातावरण दिसून येत असून अवकाळी पावसाची शक्यता आहे. अशाप्रकारचे वातावरण हे किड व रोग प्रादुर्भावासाठी अनुकूल आहे.

सद्यस्थितीमध्ये कोकण विभागामध्ये पावसाळी ढगाळ वातावरण दिसून येत असून अवकाळी पावसाची शक्यता आहे. अशाप्रकारचे वातावरण हे किड व रोग प्रादुर्भावासाठी अनुकूल आहे.

तरी अशा परिस्थितीमध्ये आंबा पिकावर फुलकिडी व फळमाशी या किडींचा व करपा रोगाचा प्रादुर्भाव तसेच काजू पिकावर काजूवरील ढेकण्या आणि फुलकिडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

तरी आंबा व काजू बागायतदारांनी आपल्या बागेची नियमितपणे पाहणी करून खालीलप्रमाणे किड व रोगनिहाय उपाययोजना कराव्यात. 

आंब्यावरील फुलकिडींनी आर्थिक नुकसानीची पातळी (१० फुलकिडी प्रति मोहोर किंवा फळांवर १ स्केल म्हणजेच १ ते २५ टक्केपर्यंत भाग प्रादुर्भावीत आढळल्यास) व्यवस्थापनाकरीता थायोमेथॉक्झाम २५ टक्के २ ग्रॅम किंवा स्पिनोसॅड ४५ टक्के प्रवाही २.५ मिली प्रति १० लीटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. (सदर कीटकनाशके लेबल क्लेम नाहीत).

करपा रोगासाठी कार्बेन्डॅझीम १२ टक्के मॅन्कोझेब ६३ टक्के या संयुक्त बुरशीनाशकाची १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

अवकाळी पाऊस झाल्यास फळमाशीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढू शकतो त्याकरीता विद्यापीठाने विकसित केलेले रक्षक सापळे (मिथिल युजेनॉल ल्युअर्ससह) प्रति हेक्टर ४ याप्रमाणात बागेमध्ये लावून फळमाशीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणावा.

काजूमध्ये मुख्यतः काजूवरील ढेकण्या, फुलकिडी आणि बोंडू व बी पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. सध्या मोहोर व बहुतांश ठिकाणी फळधारणा झाली असल्याने त्याची वेळीच पाहणी करावी.

काजूवरील ढेकण्या आणि बोंडू व बी पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थानासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ६ मि.ली. किंवा प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही १० मि.ली. यापैकी एका किटकनाशकाची फवारणी करावी.

काजूवरील फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास अॅसिटामिप्रीड २० टक्के प्रवाही ५ ग्रॅम प्रति १० लि. पाण्यातून फवारणी करावी. (सदर कीटकनाशके लेबल क्लेम नाहीत). तरी सर्व आंबा व काजू उत्पादक बागायतदारांनी त्वरीत वरीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.

अधिक वाचा: Mango Harvesting : आंबा फळातील नुकसान टाळण्यासाठी आंब्याची काढणी कशी करावी? वाचा सविस्तर

टॅग्स :आंबापीककीड व रोग नियंत्रणफळेफलोत्पादनशेतकरीशेतीकोकण