गडचिरोली : विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदियासह गडचिरोली जिल्ह्यात मागील अनेक वर्षापासून पारंपरिकरित्या टसर रेशीम शेती करून अनेक कुटुंबे आपला उदरनिर्वाह करत आहेत. ऐन, अर्जुन, जांभूळ, किंजळ, बोर आदी झाडांवर ही शेती केली जात असून जिल्ह्यात जवळपास 5 हजार 800 हेक्टर जंगलावर टसर रेशीम शेतीचे जाळे असून या व्यवसायावर 550 कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत आहे. राज्यात तुती व टसर अशा दोन प्रकारात कोशाचे उत्पादन घेतले जाते.
गडचिरोली जिल्ह्यात टसर रेशीमची शेती ऐनाच्या झाडावर केली जाते. 30 ते 75 दिवसांत कोशनिर्मितीची प्रक्रिया पूर्ण होऊन उत्पादन मिळते. तुती कोशाच्या उत्पादनासाठी या भागात आवश्यक अशी जमीन नाही. त्यामुळे तुती कोशाचे उत्पादन गडचिरोली जिल्ह्यात घेतले जात नाही. जिल्ह्यात ऐन व अर्जुन झाडावर टसर अळ्यांचे संगोपन करून टसर कोश उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यात उत्कृष्ट दर्जाचे रेशीम उत्पादित केले जात आहे.
असे घेतले जाते टसर रेशीमचे पीक
पावसाळ्याच्या सुरुवातीपासून म्हणजेच जून ते मार्च या कालावधीत वर्षातून तीनदा पिके घेतली जातात. अव्यांच्या रक्षणासाठी नायलॉन नेटचा वापर केला जातो. अळ्यांची दुसरी कात टाकण्याची अवस्था पूर्ण झाल्यानंतर प्रौढ रेशीम अळ्यांच्या संगोपनासाठी अळ्या झाडांवर स्थानांतरीत करतात. पाचव्या अवस्थेनंतर अळ्या परिपक्व होऊन कोश तयार करतात. कोश बनविण्याची क्रिया सुरू झाल्यापासून दहा दिवसांपर्यंत कोश झाडावरून काढले जाते.
या उद्योगाची वैशिष्ठये
जंगलातील ऐन/अर्जुन झाडावर टसर अळयांचे संगोपन करुन टसर कोष उत्पादन घेण्यात येते.
माहे जून-मार्च या कालावधीत वर्षभरातून तीन पीके उत्पादनाची घेतली जातात.
शासनाकडून हमी भावाने कोष खरेदी केली जाते. याशिवाय खाजगी व्यापाऱ्यांची खुली बाजारपेठ देखील उपलब्ध आहे.
शासनामार्फत अंडीपुंज पुरवठा सवलतीच्या दरात केला जातो.
किटकसंगोपनाद्वारे टसर रेशीम कोष उत्पादन करुन स्वयंरोजगार उपलब्ध करुन घेता येतो.
जंगलावर आधारित उद्योग असल्याने नैसर्गिक संपत्तीद्वारे लाभार्थ्यांना कोष उत्पादन, कोष कताई व रेशीम कापड निर्मितीद्वारे ग्रामीण भागात रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाते.