Join us
Daily Top 2Weekly Top 5

कांदा पिकात कीड रोग येऊ नये म्हणून हे टॉप दहा उपाय वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 15:14 IST

रोग पसरवणाऱ्या बुरशी, जिवाणू, विषाणू, कृमी आणि किडी यांचे अस्तित्व सर्वत्र व सर्व अवस्थेत निसर्गात असते. पोषक हवामान उपलब्ध झाल्यास यांची तीव्रता वाढते.

रोग पसरवणाऱ्या बुरशी, जिवाणू, विषाणू, कृमी आणि किडी यांचे अस्तित्व सर्वत्र व सर्व अवस्थेत निसर्गात असते. पोषक हवामान उपलब्ध झाल्यास यांची तीव्रता वाढते.

बऱ्याच वेळी महागडी औषधे फवारून सुद्धा रोग व किडींचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होत नाही. अशा वेळी एकात्मिक रोग व कीड नियंत्रण आवश्यक ठरते. यासाठी खालील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.

१) हंगामानुसार एखाद्या भागात लागवड एकाच आठवड्यात पूर्ण करावी. त्यामुळे दोन हंगामामध्ये बराच काळ अंतर राखून रोगजंतूंचा किंवा किडींचा जीवनक्रम तोडता येईल.२) रोपवाटिकेत व शेतात ट्रायकोडर्मा व्हिरीडी हेक्टरी १.२५ किलो ५०० किलो शेणखतात १५ दिवस आधी मिसळून जमिनीत टाकावे.३) प्रमाणित बियाणे वापरावे. तसेच बीजप्रक्रिया अवश्य करावी.४) पिकाची फेरपालट करावी.५) पाण्याचा चांगला निचरा न होणाऱ्या जमिनीत कांदा लागवड करू नये.६) रोपांची मूळे लागवडीपूर्वी दोन तास अगोदर १ ग्रॅम कार्बेन्डॅझिम व २ मिली कार्बोसल्फान प्रति लिटर पाणी या द्रावणात बुडवून लागवड करावी.७) रोपे नेहमी गादीवाफ्यांवर लावावीत.८)फवारणी करताना औषधाच्या द्रावणात १ लिटर पाण्यात ०.६ मि.ली. चिकटद्रव्याचा उपयोग करावा.९) फुलकिडे व रोग याकरिता औषधांची एकत्रित फवारणी करावी.१०) एकाच औषध सारखे वापरू नये. सतत एकाच औषध वापरल्यामुळे किडींची प्रतिकारशक्ती वाढते. म्हणून वेगवेगळी औषधे आलटून-पालटून वापरावीत.

पर्णीय रोग व कीड नियंत्रणाकरिताअ) पुनर्लागवडीच्या ३० दिवसांनंतर मॅन्कोझेब २.५ ग्रॅम व मिथोमिल ०.८ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे, पुनर्लागवडीच्या ४५ दिवसांनंतर ट्रायसाक्लॅझॉल १ ग्रॅम व कार्बोसल्फान २ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे, आणि पुनर्लागवडीच्या ६० दिवसांनंतर हेकसाकोनॅझोल १ ग्रॅम व प्रोफेनोफॉस १ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

ब) पुनर्लागवडीच्या ३० दिवसांनंतर मॅन्कोझेब २.५ ग्रॅम व मिथोमिल ०.८ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे, पुनर्लागवडीच्या ४५ दिवसांनंतर प्रोपीकोनॅझोल १ ग्रॅम व कार्बो सल्फान २ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे, आणि पुनर्लागवडीच्या ६० दिवसांनंतर कॉपर ऑक्सिक्लोराईड २.५ ग्रॅम व प्रोफेनोफॉस १ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

अशा प्रकारे कांदा पिकात रोग व किडींचे व्यवस्थापन केल्यास गुणवत्तापूर्ण कांद्यांचे भरपूर उत्पादन होऊन शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.

टॅग्स :कांदापीकशेतकरीकीड व रोग नियंत्रणशेतीभाज्या