फायटोप्थोरा ब्लाइट हा रोग फायटोप्थोरा प्रजातीच्या बुरशीमुळे होतो. पिकाच्या रोप अवस्थेत हा रोग झाल्यास पाने व देठ करपतात.
ज्या ठिकाणी २० अंश से. तापमान, चढ उताराची जमीन आणि अधिक पर्जन्यमान होते त्या ठिकाणी हा रोग प्रमुख्याने रोपावस्थेत येत असल्याने तूर पिकाचे मोठे नुकसान होते.
मागील हंगामात प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून आला आहे. महाराष्ट्रात/मराठवाड्यात हा रोग पिकाच्या शाखीय वाढीच्या अवस्थेत उशिराने येताना दिसतो.
लक्षणे◼️ फायटोप्थोरा ब्लाईटमुळे प्रथमतः खोडावर लंबगोलाकार परंतु टोकाकडे निमुळते होत गेलेले राखेरी चट्टे पडतात.◼️ कालांतराने तिथे खाच दिसायला लागते तसेच तेथील खोडाचा भाग फुगतो व गाठी पडतात त्या ठिकाणी धागेरी आकारदेखील तयार होतो.◼️ फांद्यावर व खोडावर अधिक प्रादुर्भाव झाल्यास डिंकासारखा चिकट पदार्थाचा स्त्राव ओघळू लागतो.◼️ खोड तपकिरी पडून करपते तसेच फांद्या देखील करपू लागतात.◼️ पावसाच्या काळात याचे प्रमाण वाढते.
कसे कराल रोग व्यवस्थापन?◼️ तूरपीक लागवडीसाठी समपातळीतील पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.◼️ जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होत नसेल तसेच चोपण किंवा चढ उतार उताराच्या जमिनीत पिकाची लागवड झाली असेल या ठिकाणी जमिनीतून उदभवणारे रोग जसे की फायटोप्थोरा, मर आणि मूळकुज इत्यादी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येतो.◼️ शेतामध्ये वनस्पतीचे कुजके अवशेष, काश्या, धसकटे व काडी कचरा असू नयेत. शेत आणि बांध स्वच्छ ठेवावेत जेणेकरून रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार होणार नाही.◼️ उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी जेणे करून सूर्यकिरणांमुळे बुरशीचे बीजाणू नष्ट पावतील.◼️ तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच जमिनीत तूर पीक घेऊ नये.◼️ शेताच्या चारही बाजूस चर काढावा जेणे करून शेतात पाणी साचून फायटोप्थोरा बुरशीची वाढ होणार नाही.◼️ पिकांची फेरपालट व आंतरपिकाचा शेतीत समावेश असावा जेणेकरून बुरशीच्या वाढीस आळा बसेल.◼️ बीजप्रक्रियेमध्ये जैविक बुरशीनाशकांचा वापर जसे की, ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स १० ग्रॅम प्रती किलो बियाणास वापरावे, अथवा बीज प्रक्रियेमध्ये १.५ ग्रॅम आंतरप्रवाही (उदा: कार्बेन्डाझिम) आणि २.५ ग्रॅम स्पर्शजन्य (उदा: थायरम) प्रती किलो बियाण्यास चोळावे. अथवा कार्बोक्झीन ३७.५% + थायरम ३७.५% या बुरशीनाशकाची ४.० ग्रॅम प्रती किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी.◼️ रोगाची लक्षणे दिसताच जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्सची २०० ग्रॅम/मिली प्रती १० लीटर पाणी याप्रमाणे रोगग्रस्त भागामध्ये आवळणी करावी.◼️ रासायनिक बुरशीनाशकांमध्ये मेटाल्कझिल घटक फायटोप्थोरा बुरशीसाठी नियंत्रण म्हणून प्रभावी असल्याचे प्रयोगांच्या निष्कर्षावरून दिसून आले आहे.- वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीकृषि संशोधन केंद्र, बदनापूर
अधिक वाचा: कापूस पिकातील गळफांदी आणि फळफांदी कशी ओळखायची? वाचा सविस्तर