Join us

हरभरा व गहू पिकाचे उत्पादन होईल दुप्पट; विसरू नका 'या' फायद्याच्या बाबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 15:55 IST

Crop Management : पिकांच्या अचूक अवस्थेत पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण व खताची फवारणी याकडे लक्ष दिले तर चांगले उत्पादन मिळविणे शक्य होते.

राज्यात सध्या सर्वत्र हरभरा व  गव्हाचे पीक जोमदार वाढीच्या, फुलोरा किंवा पक्वतेच्या अवस्थेत आहे.

या अवस्थांमध्ये पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण व खताची फवारणी याकडे लक्ष दिले तर चांगले उत्पादन मिळविणे शक्य होते.

“हरभरा पिकाच्या उत्पादनवाढीच्या महत्त्वाच्या बाबी”       • हरभरा पिकाच्या फांद्या फुटणे व घाटे भरणे या पाणी देण्याच्या महत्त्वाच्या अवस्था असून जास्तीचे पाणी उपलब्ध असेल तर ते पाणी फुलोऱ्याच्या काळात हरभरा पिकास द्यावे.

• तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास हरभऱ्याची चांगली वाढ होते. मात्र फुलोऱ्याच्या काळात तुषारने पाणी देऊ नये कारण त्यामुळे काही प्रमाणात फुलोरा झडतो. तेवढ्या काळात प्रचलित पध्दतीने हरभरा पिकास पाणी द्यावे.

• हरभरा पिकावरील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी हेलिओकील २० मि.ली. १० लिटर पाण्यातून फुलोरा ते घाटे भरण्याच्या काळात दोन वेळा फवारावे.

• फुलोरा ते घाटे भरताना पोटॅशियम नायट्रेट (१३ः०ः४५) खताची प्रत्येकी १% (१० लिटर पाण्यात १०० ग्रॅम) अशा २ फवारण्या १५ दिवसाच्या अंतराने कराव्यात.

गहू पिकाच्या उत्पादनवाढीच्या महत्त्वाच्या बाबी” 

• गव्हाच्या मुकुटमुळे फुटण्याची अवस्था, कांडी धरण्याची अवस्था, फुलोरा, दाणे चिकात असताना व दाणे भरण्याची अवस्था या पाणी देण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या संवेदनक्षम अवस्था आहेत.

• त्यासाठी गहू पिकास २१ दिवसाच्या अंतराने जमिनीच्या प्रकारानुसार ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

• गव्हावरील तांबेरा व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी ३० ग्रॅम मॅंकोझेब किंवा २५ ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराइड प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.

• गहू पिकावर पेरणीनंतर ५५ व ७० दिवसांनी २ % (१० लिटर पाण्यात २०० ग्रॅम) १९ः१९ः१९ हे खत फवारल्याने गव्हाच्या दाण्यावर चकाकी येते तसेच दाण्यांच्या वजनात वाढ होते.

डॉ. कल्याण देवळाणकरसेवा निवृत्त शास्त्रज्ञकृषी विद्यापीठ. 

हेही वाचा : कावळा, भोरड्या, मैना, बगळे शेतीच्या लई फायद्याचे; कीड नियंत्रणासाठी राबतात मोफत मजूर निसर्गाचे

टॅग्स :पीक व्यवस्थापनशेतीशेतकरीपाणीकीड व रोग नियंत्रणशेती क्षेत्रगहू