Join us

Suryaful Lagwad : उन्हाळी हंगामात फायद्याचे तेलबिया पिक 'सूर्यफूल'; कशी कराल लागवड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 16:47 IST

Suryaful Lagwad विविध प्रकारच्या गळीत धान्य पिकांमध्ये 'सूर्यफुल' लागवड रब्बी तसेच उन्हाळी हंगामातही फायदेशीर ठरत आहे.

विविध प्रकारच्या गळीत धान्य पिकांमध्ये 'सूर्यफुल' लागवड रब्बी तसेच उन्हाळी हंगामातही फायदेशीर ठरत आहे

विविध जाती- सूर्यफुल लागवडीतून अधिक उत्पादनासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सुधारीत जातींची शिफारस केली आहे.- त्यामध्ये मॉडर्न, एस. एस. ५६, ई. सी. ६९८७४, ई. सी ६८४१३, ई. सी. ६८४१४, ई. सी ६८४१५, बी. एस. एच, सूर्या, एम. एस. एफ. एच. १ या ८५ ते १२० दिवसांत तयार होणाऱ्या व हेक्टरी १० ते १५ क्विंटल उत्पादन देणाऱ्या सुधारीत जातींचा समावेश आहे.

पूर्वमशागत- जमीन उभी-आडवी खोल नांगरून २-३ कुळवाच्या पाळ्या देऊन भुसभुशीत करावी.- शेवटच्या कुळवणीपूर्वी हेक्टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीवर पसरवून मातीत मिसळून द्यावे.- जमीन समपातळीत आणावी. शुध्द, प्रमाणित, वजनदार व निरोगी बियाणे लागवडीसाठी निवडावे.- पीक काढणीनंतर तयार झालेले बियाणे लगेच पेरणीसाठी वापरू नये.- हेक्टरी १० ते १२ किलो बियाणे वापरावे.- पेरणीपूर्वी बियाणे १२ तास पाण्यात भिजवून नंतर सावलीत वाळवावे.- बियाण्याला प्रतिकिलोस २५ ग्रॅम प्रमाणात ट्रायकोडर्मा हर्जिनम या जैवनियंत्रणाची बीज प्रक्रिया करावी.

पेरणी कशी करावी?- पिकाची पेरणी रब्बी हंगामात ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात, तर उन्हाळी हंगामात फेब्रुवारीपर्यंत करावी.- भारी जमिनीत पेरणी करताना दोन ओळीत ६० सेंटीमीटर अंतर ठेवावे.- दोन झाडातील अंतर ३० सेंटीमीटर ठेवावे. एका ठिकाणी दोन दाणे पेरावेत.

आंतरमशागत- पेरणीनंतर १० ते १२ दिवसांनी विरळणी करून प्रत्येक ठिकाणी जोमदार रोप ठेवावे.- पेरणीनंतर २० दिवसांनी कोळपणी करावी, तर ३० ते ४० दिवसांनी खुरपणी करावी.- पिकाला हलकीशी मातीची भर द्यावी.- सूर्यफुलाची चांगली बीजधारणा होण्यासाठी मशागत गरजेची आहे.

पाणी व्यवस्थापनउन्हाळी हंगामात पिकाला दहा ते बारा दिवसांच्या अंतराने आठ ते नऊ वेळा पाणी द्यावे.

विशेष काळजीसूर्यफुलांची बीजधारणा चांगली होण्यासाठी फुले उमलण्याच्या काळात ४ ते ६ दिवस रोज सकाळी हातावर मलमल/तलम सुती कापड बांधून फुलावर हळूवारपणे हात फिरवावा किंवा शेतात मधमाशांच्या पेट्या ठेवाव्यात म्हणजे फुलातील बिया पूर्ण भरण्यास मदत होते.

काढणी व्यवस्थापनपीक तयार होताना फुलाजवळील पाने पिवळी पडतात, दाणे टणक होतात. फुले काढून उन्हात वाळवावी, दाणे वेगळे करावे व वाफणी करून वाळवून ठेवावेत.

अधिक वाचा: डाळिंबाच्या झाडाला कोणत्या महिन्यात किती पाण्याची गरज? पहा सविस्तर वेळापत्रक

टॅग्स :सुर्यफुललागवड, मशागतपीकपीक व्यवस्थापनपेरणीसेंद्रिय खतपाणी