ऊस पीक हे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पिकांपैकी एक पीक आहे. सुरू, पूर्वहंगामी, खोडवा अशा वेगवेगळ्या हंगामामध्ये उसाचे पीक घेतले जाते. ऊस हे सर्वांत जास्त पाण्याची गरज असणाऱ्या पिकांपैकी एक पीक आहे. उसाचे उत्पादन पाण्याच्या नियोजनावर अवलंबून असते तरी या पिकाला कधी, किती व कसे पाणी द्यावे हे सर्वांत महत्त्वाचे आहे.
कोणत्या अवस्थेत पाणी द्यावे?
ऊस पिकाला वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये पाणी देणे गरजेचे असते. यामध्ये उगवण अवस्था, फुटवे फुटण्याची अवस्था, जोमदार वाढीची अवस्था आणि पक्वता अवस्थेमध्ये पाण्याची आवश्यकता पिकाला असते. उगवण अवस्थेमध्ये पिकाला ८ सेंटीमीटर उंचीचे पाणी देणे गरजेचे असते. त्यानंतरच्या स्टेजला १० सेंटीमीटर पाणी देणे गरजेचे असते.
किती पाणी द्यावे?
उसाच्या आडसाली हंगामाला ३८ ते ४२ पाण्याच्या पाळ्या देणे गरजेचे असते. पूर्वहंगामी उसासाठी ३० ते ३५ पाण्याच्या पाळ्या, खोडवा उसासाठी ३० ते ३५ पाण्याच्या पाळ्या लागतात.
कधी द्यावे पाणी?
उन्हाळ्यामध्ये ८ ते १० दिवस हे पाण्याच्या दोन पाळीतील अंतर असायला हवे. तर हिवाळ्यात दोन पाण्याच्या पाळीतील अंतर हे १५ ते २० दिवस असायला हवे. पावसाळ्यामध्ये पावसाची परिस्थिती बघून पाणी देणे गरजेचे आहे.
पाणी देण्याच्या पद्धती
ठिबक सिंचन, तुषार सिंचन, रेन पाईप आणि पाट पाण्याच्या पद्धती उसाला पाणी देण्यासाठी वापरण्यात येतात. ठिबकच्या माध्यमातून पाणी दिले तर पाणी थेट मुळाला मिळते आणि उसाची वाढ चांगली होते. ठिबकमुळे तणाचा प्रादुर्भाव कमी होते आणि उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होते. ठिबक सिंचनासोबत पाणी आणि खताचे नियोजन केले तर उसाला फायदा होतो.
माहिती स्त्रोत
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता. फलटण