lokmat Supervote 2024
Lokmat Agro >स्मार्ट शेती > निळ्या रंगाच्या कापसावर होतेय संशोधन; जाणून घ्या रंगीत कपाशीबद्दल…

निळ्या रंगाच्या कापसावर होतेय संशोधन; जाणून घ्या रंगीत कपाशीबद्दल…

Research is being done on blue cotton in India; Know about coloured cotton | निळ्या रंगाच्या कापसावर होतेय संशोधन; जाणून घ्या रंगीत कपाशीबद्दल…

निळ्या रंगाच्या कापसावर होतेय संशोधन; जाणून घ्या रंगीत कपाशीबद्दल…

भारताच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडे कापसाच्या ६००० जातींचा संग्रह आहे.  त्यामध्ये अंदाजे ४० जाती रंगीत कापसाच्या (coloured cotton) आहेत.

भारताच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडे कापसाच्या ६००० जातींचा संग्रह आहे.  त्यामध्ये अंदाजे ४० जाती रंगीत कापसाच्या (coloured cotton) आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

विदर्भ मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना कापूस पिकाबद्दल काही सांगण्याची गरज नाही.  कारण खूप मोठी ग्रामीण अर्थव्यवस्था या प्रदेशातील त्याच्यावरच अवलंबून आहे. परंतु आपल्याला जसा आजघडीला पांढरा शुभ्र कापूस दिसतो तसा तो अगदी १०० वर्षांपर्यंत नव्हता असे सांगितले तर सगळ्यांनाच नवल वाटेल. कापसामध्ये अनेकविध रंग असलेल्या जाती होत्या आणि भारतामध्येही त्यांची शेती होत होती. साधारण १९५० सालापर्यंत अशा नोंदी आढळल्या आहेत की आंध्र प्रदेशातून खाकी रंगाच्या कापसाची निर्यात जपानला केली जात होती.

अर्थात जसजसे या उद्योगात यांत्रिकीकरण होत गेले तसा कापसाच्या नव्या जातींचा उदय होत गेला. त्यात पुर्णतः पांढऱ्या शुभ्र दिसणाऱ्या, लांब धाग्याच्या कापसाचे वर्चस्व जगभर पसरले. आता तर बीटी शिवाय अन्य जातीचा कापूसही शेतकऱ्यांच्या शेतावर पहायला मिळत नाही. भारताच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडे कापसाच्या ६००० जातींचा संग्रह आहे.  त्यामध्ये अंदाजे ४० जाती रंगीत कापसाच्या आहेत.

कापड उद्योगात विविध रासायनिक रंगांचा वापर मानवी जीवनावर अनेक प्रकारे हानीकारक परिणाम घडवत असतो. या रंगाच्या उत्पादन प्रक्रियेत पर्यावरणाला हानी पोचवली जाते. अनेक विषारी धातू पाण्यात मिसळले जातात. तसेच त्यात काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याला धोका पोचतो. त्यावर उपाय म्हणून या रासायनिक रंगांचा वापर कमी करावा लागावा म्हणून साधारण १९८० च्या दशकात कापूस पैदासकारांचे रंगीत कापसाकडे नव्याने लक्ष वळले. अमेरिकेत सॅली फॉक्स या कापूस पैदासकाराने आठ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर मशिनवर सूत तयार होऊ शकेल अशी लांब धाग्याचा कापूस देणारी जात तयार केली. राखाडी, पिवळा, नारिंगी आणि गुलाबी अशा रंगाच्या जाती तयार करण्यात तिला यश मिळाले.

सध्या प्रामुख्याने युनायटेड स्टेट्स, चीन, पेरू आणि इस्राएल या देशांमध्ये रंगीत कापसाची लागवड केली जाते. भारतात मात्र त्याचे प्रमाण अद्याप तरी जास्त नाही. बरेचसे काम प्रायोगिक तत्वावर केले जाताना दिसते. नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने वैदेही ९५ नावाची ब्राऊन रंगाच्या धाग्याची कापूस जात विकसित केली आहे. तसेच धारवाड येथील कृषी विद्यापीठात डीडीसीसी-१ आणि डिएमबी-२२५ या नावाच्या ब्राऊन रंगाच्या दोन कापूस जाती २०२१ साली प्रसारीत करण्यात आल्या आहेत. या देशी प्रकारातील असून त्यापासून खादीचे कपडे बनवून त्याचे मार्केटींग करण्याचे प्रयत्न कर्नाटक सरकारमार्फत करण्यात येत आहेत. तसेच बंगलोरमधील एक कंपनी त्यासाठी शेतकऱ्यांकडून कंत्राटी पध्दतीने त्याची शेती करून घेण्याचाही प्रयत्न करत आहे. या सर्व प्रयत्नांना यश आले तर त्याची शेती भारतातही वाढायला हरकत नसावी.

सध्या संशोधक निळ्या रंगाच्या कापसाची जात निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. असा कापूस अतिशय लोकप्रिय असलेल्या जीन्सच्या निर्मितीसाठी खूप क्रांतीकारक ठरू शकेल. त्यासाठी जैवतंत्रज्ञान वापरून नीळ या पिकातील जनुके कापसात आणून काही वेगळा बदल घडवता येतो का याच्या प्रयत्नात शास्त्रज्ञ आहेत.

- सचिन पटवर्धन

(लेखक ग्राम विकसन क्षेत्रात सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.)

Web Title: Research is being done on blue cotton in India; Know about coloured cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.