Join us

न चुकता लक्षात ठेवा 'या' टिप्स; तुमचेही ठिबक चालेल दोन-चार वर्ष अधिक

By रविंद्र जाधव | Updated: January 9, 2025 13:35 IST

Care Of Drip Irrigation System : अलीकडे जवळपास सर्वच शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचनाचे संच दिसून येतात. या सिंचनाच्या प्रभावी वापरामुळे शेतकरी अल्प मेहनतीत आणि अल्प पाण्यात अधिकाधिक पिकांचे उत्पादन घेत आहेत. मात्र यासोबत असेही दिसून येते की शेतकऱ्यांकडील हे ठिबक सिंचन संच केवळ तीन ते चार वर्षेच उपयोगात येते. 

अलीकडे जवळपास सर्वच शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचनाचे संच दिसून येतात. या सिंचनाच्या प्रभावी वापरामुळे शेतकरी अल्प मेहनतीत आणि अल्प पाण्यात अधिकाधिक पिकांचे उत्पादन घेत आहेत. मात्र यासोबत असेही दिसून येते की शेतकऱ्यांकडील हे ठिबक सिंचन संच केवळ तीन ते चार वर्षेच उपयोगात येते. 

याचे कारण म्हणजे या सिंचनाची योग्य वेळी योग्य देखभाल न केल्यामुळे हे संच दीर्घकाळ उपयोगात येत नाहीत. म्हणूनच आज आपण ठिबक सिंचनाची निगा कशी राखावी हे जाणून घेणार आहोत. यामुळे आपल्याला ठिबक सिंचनाच्या संचाचे आयुष्य वाढवता येईल, परिणामी खर्चातही बचत करता येणे शक्य आहे.

दररोज 'हे' करा 

१) पिकास पाणी देणे सुरू करण्यापुर्वी पंप सुरू करून फिल्टर ५ मिनिटे बॅकवॉश करावा.

२) स्क्रिन फिल्टरच्या झाकणीवरील ड्रेन व्हॉल्व्ह उघडून जाळीमध्ये अडकलेली घाण पाण्याखाली धरुन काढून टाकावी.

३) ड्रीपर्स किंवा तोट्या व्यवस्थित चालतात किंवा नाही याची पाहणी करावी. गरजेनुसार त्या बदलुन घ्याव्या.

४) पाण्याचा दाब, जमिनीवर पसरणारा ओलावा, संचातून होणारी पाण्याची गळती इत्यादीचे निरीक्षण करावे.

दर आठ दिवसांनी 'हे' करा 

१) सॅन्ड फिल्टरचे झाकण उघडून आतून हात घालून वाळू साफ करावी व बॅकवॉश करून घ्यावे. सॅन्ड फिल्टरमध्ये कधीही नाल्याची किंवा नदीची वाळू टाकू नये. सॅन्ड फिल्टरमध्ये नेहमी ३/४ भाग इतकी वाळू असायला पाहिजे मात्र वाळूची पातळी कमी झाल्यास वाळू टाकून घ्यावी.

२) स्क्रीन फिल्टरचे झाकण उघडून आतील जाळीचा फिल्टर साफ करावा.

३) नियमितपणे व गरजेनुसार मेन व सबमेन फ्लश कराव्या.

४) एकदा लॅटरलची शेवटची बंद टोके एन्ड प्लग काढून लॅटरलमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रेशरने पाणी सोडावे व त्या स्वच्छ करून घ्याव्यात.

रासायनिक प्रक्रिया 

• दर १० किंवा १५ दिवसांनी आम्ल प्रक्रिया, क्लोरीन प्रक्रिया गरजेनुसार करणे आवश्यक आहे. आम्ल प्रक्रिया ही पाण्यातील कार्बोनेटस् व लोह यांचा साठा धुवून काढण्यासाठी केली जाते.

• क्लोरिन प्रक्रिया ही पाण्यातील सुक्ष्मजंतूंची वाढ रोखण्यासाठी किंवा नायनाट करण्यासाठी केली जाते. ओढा, नदी, तलाव किंवा कॅनालच्या पाण्यावर ठिबक सिंचन करावयाचे असल्यास जाळीचे व वाळूचे दोन्ही फिल्टर बसविणे अत्यावश्यक आहे.

• विहिरीचे किंवा बोअरवेलचे पाणी स्वच्छ असेल, त्यात शेवाळ, सेंद्रीय पदार्थाचे अवशेष नसल्यास फक्त जाळीचे फिल्टर वापरावे. ठिबक सिंचन संच सुरळीत चालण्यासाठी लॅटरलमध्ये १५ ते २० मीटर प्रेशर आवश्यक असते.

• याशिवाय संचास लागणारे एकूण प्रेशर, पाण्याच्या उपलब्धतेनुसार, पाणी वहनगती ईत्यादींची पुर्तता करणारा विद्युत पंपसेट घ्यावा.

• सध्या शेतकऱ्याकडे उपलब्ध असलेले कमी हेड व जास्त विसर्ग देणारे विद्युत पंपसेटच ठिबक संचासाठी वापरावे असा शेतकऱ्यांचा आग्रह असतो. कमी प्रेशरच्या पंपसेटमुळे सर्व झाडांना सारखे पाणी मिळत नाही व मायक्रोट्युब किंवा ड्रिपरमध्ये साचलेली घाण बाहेर फेकली जात नाही.

• ज्यामुळे मॅनिफोल्ड व मुख्य पाईपमध्ये जमा झालेले सुक्ष्म मातीचे कण अपुऱ्या दाबामुळे फ्लश करूनही बाहेर टाकले जात नाहीत. यामुळे ड्रिपर बंद पडतात. मग संच चालत नाही म्हणून गुंडाळून ठेवला जातो.

हेही वाचा : माती तपासणी करायची आहे? मग 'या' पद्धतीने घ्या नमूना; होईल अधिक फायदा सोबत मिळेल अचूक सल्ला

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीक व्यवस्थापनपाणी