महाराष्ट्रातील रबी हंगामात मोहरी, करडई, ज्वारी व इतर भाजीपाला पिकांत मावा कीड मोठ्या प्रमाणात दिसते, ज्यामुळे पिकाचे जवळ-जवळ ९०% एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होवु शकते.
प्रादुर्भावाची कारणे
- थंड व ढगाळ वातावरणामुळे पिकाच्या सुरूवातीपासुन ते पीक निघेपर्यंत या किडीचा प्रादुर्भाव दिसुन येतो.
- ही कीड झाडाच्या पानांतून व इतर कोवळ्या भागातून रस शोषण करते.
- त्याच्या तीव्र प्रादुर्भावामुळे पाने पिवळी पडून वाळतात व झाडाची वाढ खुंटते, तसेच फुल व शेंग धारणा कमी होते.
- ज्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट दिसून येते.
मावा किडीचे नियंत्रण
पिकाची लागवड सामान्य पेरणीच्या वेळा पाळाव्यात. असे केल्याने किडीला असलेल्या अनुकूल वातावरणापासुन पिकाची सुटका होईल. तसेच खालील सांगितल्याप्रमाणे जैविक घटकांचा वापर करून आपण मावा या किडीला नियंत्रणाखाली आणू शकतो.
अ) मित्र कीटकांचा वापर
१) लेडिबर्ड बिटल
या परभक्षक मित्र किटकाचे प्रौढ भुंगे व त्याच्या अळ्या प्रामुख्याने मावा किडीवर जगतात. याची अळी ६-७ मि.मी. लांब असून रंगाने करडी व त्यावर पांढरे ठिपके असतात. या मित्र किटकाची अळी प्रति दिवस २५ मावा तर प्रौढ भुंगा ५६ मावा खातो. त्यामुळे पिकाचे जैविक पद्धतीने मावा या किडीपासून संरक्षण होते.
२) सीरफीड माशी
या माशीची अळी रंगाने हिरवट असून तोंडाकडचा भाग टोकदार असतो, तसेच या अळीला पाय नसतात. ही एक अळी दिवसभरात साधारणपणे १०० मावा खाते. मोहरी पिकावर मावा किडीसोबत वरील मित्र किटक आढळल्यास रासायनिक किटकनाशका ऐवजी सुरूवातीस ५ टक्के निंबोळी अर्काचा वापर करणे फायद्याचे ठरते.
ब) बुरशीजन्य किटकनाशके
१) मेटरायझियम ॲनिसोपली
या बुरशीला 'ग्रीन मस्करडाइन' बुरशी म्हणतात, कारण यामुळे मावा किडीवर हिरवट बुरशीची वाढ होते, त्यामुळे मावा कीड मरून जातो.
२) व्हर्टिसिलीयम लॅकॅनी
ही बुरशी रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी अत्यंत फायदेशीर आहे. वरील बुरशीजन्य किटकनाशकाची ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात संध्याकाळी किंवा सकाळी हवेची आर्द्रता असताना फवारणी करावी.
अधिक वाचा: Organic Carbon : जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्याचे सोपे उपाय; वाचा सविस्तर