सध्या शेवटच्या टप्प्यातील आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. पावसामुळे फळगळती बरोबरच आंबा खराब होण्याची शक्यता आहे.
अवकाळी पाऊस झाला, तर फळावर देठकुजवा किंवा फळामध्ये साकाची भीती आहे. यामुळे तयार झालेला आंबा लवकरात लवकर काढण्याची बागायतदारांची लगबग सुरू आहे.
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर फळगळती झाली आहे. शिवाय पावसामुळे आंब्यावर देठकुजव्याचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. शिवाय फळात साका पडू शकतो.
आंब्यातील साका आणि फळकुजसाठी उपाययोजना
- तुरळक ठिकाणी पाऊसाची शक्यता लक्षात घेता तयार आंबा फळांची काढणी देठासह चौदा आणे (८० ते ८५ टक्के) पक्वतेला उन्हाची तीव्रता कमी असताना तसेच पाऊसाचा अंदाज घेवून करावी.
- पाऊस, ढगाळ व दमट वातावरणामुळे आंबा फळावर करपा रोगाचे काळे डाग पडतात. अशावेळी फळांवर बुरशीनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे. बुरशीनाशकांची फवारणी न केल्यास काळे डाग वाढत जाऊन फळे पिकताना सडण्याची प्रक्रिया होऊ शकते.
- ज्या ठिकाणी आंबा काढणीकरीता १५ दिवस शिल्लक असतील अशा ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरीता कार्बेन्डॅझीम या बुरशीनाशकाची १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.
- ढगाळ व दमट वातावरणामुळे काढणी केलेल्या आंबा फळावर फळकुज या रोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते, यामुळे फळे काढल्यानंतर फळांवर तपकिरी काळ्या रंगाचे चट्टे दिसुन फळे कुजतात आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
- फळकूज नियंत्रणासाठी फळे काढणीनंतर लगेचच ५० अंश सेल्सिअस च्या पाण्यात १० मिनीटे बुडवुन काढावीत (उष्ण जलप्रक्रिया). अशी फळे खोक्यात भरावीत अथवा पिकण्यासाठी आडीत ठेवावीत.
- आंबा फळांची काढणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर करावी.
- उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने आंब्याची फळे काढल्यानंतर लगेचच सावलीमध्ये ठेवावीत.
- आंबा फळांची वाहतूक रात्रीच्या वेळेस करावी.
- आंबा वाहतुक भरदिवसा उन्हामध्ये वाहनांच्या टपावरुन करु नये.
अधिक वाचा: शेतीला चांगले दिवस येणार? मागील ४० वर्षांपासून कसे वाढत गेले शेतजमिनीचे भाव; वाचा सविस्तर