Agriculture News : थंडीच्या दिवसात डाळिंबाच्या बागेची काळजी घेणे महत्त्वाचे असते, कारण अति थंडीमुळे झाडांची पाने जळू शकतात आणि फळे तडकण्याची शक्यता असते. या काळात डाळिंब बागेचे संरक्षण कसे करावे, पाणी कधी आणि किती अंतराने द्यावे, यासह काय काळजी घ्यावी, हे समजून घेऊयात....
डाळिंब बागेत धूर किंवा बागेला गोणपाट किंवा साडीने किंवा शेड नेट बांधून थंडी पासून संरक्षण करावे. थंडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी संध्याकाळच्या वेळी हलके व वारंवार / तुषार सिंचन च्या सहाय्याने पाणी द्यावे.
सिंचन
सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. झाडाजवळचे २० टक्के क्षेत्र ओलिताखाली येणे गरजेचे असते. त्यापेक्षा अधिक क्षेत्र ओलिताखाली आल्यास, बागेत सूक्ष्म वातावरण तयार होऊन खोडांना लहान छिद्रे पाडणारे भुंगेरे व मर रोग यांचा प्रादुर्भाव वाढतो. खोडकिडीचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी डाळिंबाला हलक्या जमिनीत चार खोडे ठेवन वळण देणे योग्य ठरते.
पाणी देणे : बागेला मोकाट सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. यामुळे जमिनीतील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.
धूर करणे : ज्या बागेमध्ये बहर धरलेला आहे आणि फळांची वाढ होत आहे, अशा ठिकाणी पहाटेच्या वेळी धूर करावा. बागेतील तोडलेल्या फांद्या, कचरा जाळून हा धूर तयार करता येतो.
आच्छादन : थंडी आणि धुक्यापासून बचावासाठी बागेला जाळी किंवा पातळ कापडाचे आच्छादन घालता येते.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
