Tur Crop Pest Control : तूर हे विदर्भातील प्रमुख डाळवर्गीय पीक आहे. आंतरपिक म्हणून ही तूर पिकाची ओळख आहे. उत्पन्नात घट आणणाऱ्या अनेक कारणांपैकी तुरीवर होणारा किडींचा प्रादुर्भाव हे एक मुख्य कारण आहे. (Tur Crop Pest Control)
मागील काही आठवड्यातील असणारे सतत चे ढगाळ वातावरण व रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे. तूर पिकावर वेळोवेळी अनेक प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. तसेच साठवणूकी मध्ये ही अनेक किडी तुरीवर स्वतःचे पोषण करतात. परंतू फुले व शेंगा भरण्याच्या अवस्थेत होणारा किडींचा प्रादुर्भाव अतिशय नुकसानकारक ठरतो.
कधी-कधी जास्त प्रमाणात कीड आल्यास ७० टक्यांपेक्षा ही अधिक नुकसान शेंगा पोखरणाऱ्या किडीपासून होते. तूर पिकावर मुख्यतः पिसारी पतंगाची अळी, शेंगावरील माशीची अळी व हिरवी घाटे अळी अशा तीन प्रकारच्या शेंगा पोखरणाऱ्या किडी आढळतात.
शेंगा पोखरणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव तुरीचे पीक कळी अवस्थेत आल्यावर होत असतो. त्यामुळे तूर पीक शेंगधारणा अवस्थेपासूनच या किडींचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
पिसारी पतंग या पतंगाची अळी १२.५ मि.मी. लांब हिरवट तपकिरी रंगाची असते, तिच्या अंगावर सूक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगावरील साल खरडून छिद्र करते व बाहेर राहून दाणे पोखरते.
पिसारी पतंग प्रौढ
प्रादुर्भावीत तूर शेंग
शेंग माशी : या माशीची अळी बारीक गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून तिला पाय नसतात. तोंडाकडील भाग निमूळता व टोकदार असतो. ही अळी शेंगाच्या आत राहून शेणातील दाणे अर्धवट कुरतडून खाते व त्यामुळे दाण्याची मुकानी होते.
शेंग माशी प्रौढ
प्रादुर्भावीत तूर शेंग
शेंगा पोखरणारी हिरवी अळी (हेलीकोवर्षा): या किडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगा यावर अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या सुरूवातीस सुस्त असून प्रथम कोवळी पाने व देठे कुरतडून खाऊन तुरीच्या कळ्या व फुले खाऊन नुकसान करतात.
पूर्ण वाढ झालेली अळी ३० ते ४० मि.मी. लांब, विविध रंग छटेत दिसून येते जसे पोपटी, फिक्कट गुलाबी व करड्या रंगाची असून तिच्या पाठीवर तुटक करड्या रेषा असतात. मोठ्या अळ्या शेंगाना छिद्र करून आतील दाणे पोखरून खातात. ही कीड बहुभक्षी असून हरभरा, वाटणा, सोयाबीन, चावली आदी कडधान्यावर फार मोठ्या प्रमाणावर आढळून येते. याशिवाय कपाशी, ज्वारी, टोमॅटो, तंबाखू, सूर्यफुल, करडई इत्यादी पिकांवर ही आढळून येते.
डिसेंबर ते जानेवारी महिन्यात आभाळ आभ्राच्छदीत असल्यास या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. एकात्मिक व्यवस्थापन या चार ही किडी कळ्या, फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकरीता खालील प्रमाणे नमूद उपाययोजना कराव्यात.
१. प्रति हेक्टर २० पक्षी थांबे शेतात उभारावेत. त्यामुळे पक्षी किडींच्या अळ्या खाऊन फस्त करतात. तसेच घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी हेक्टरी २० कामगंध सापळे लावावेत.
२. आर्थिक नुकसान संकेत पातळी
* पिसारी पतंग ५ अळ्या /१० झाडे अशी आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठताच खालील उपाययोजना कराव्या.
* शेंगे माशी ५ ते १० टक्के नुकसानग्रस्त दाणे.
* घाटे अळी ५-६ पतंग प्रति सापळा २-३ दिवसात किंवा
* १ अळी प्रति झाड किंवा ५-१० टक्के नुकसान
१. पहली फवारणी (५० टक्के फुलोरावर असतांना) : निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अॅझाडीरेक्टीन ३०० पीपीएम ५० मि.ली. किंवा अॅझाडीरेक्टीन १५०० पीपीएम २५ मि.ली. किंवा एच.ए.एन.पी.व्ही. (१x१० पिओबी/मि.ली.) ५०० एल.ई/हे. किंवा बॅसिलस थुरेन्जेनेसीस १५ मि.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ ई.सी. २० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२. दुसरी फवारणी (पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी) : इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के ३ एस.जी ग्रॅम किंवा लॅबडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही १० मि.ली. किंवा क्लोरॅट्रॅनीलिप्रोल १८.५ टक्के एस.सी. प्रवाही २.५ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे, त्यामुळे झाडावरील अळ्या पोत्यावर पडतील त्या गोळा करून नष्ट कराव्यात. पाने गुंडाळणारी मारुका अळीच्या नियंत्रणासाठी फ्लूबेंडामाईड २० डब्लू जी. ६ ग्रॅम किंवा नोवालुरोन ५.२५ + इंडोक्साकार्ब ४.५० एससी १६ मि.ली. यांची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तूर पिकावर किडींचा वाढता प्रादुर्भाव पाहता शेतकऱ्यांनी वेळेवर निरीक्षण, सापळे, जैविक उपाय व निश्चित फवारण्या या सर्वांचा एकत्रित वापर करणे अत्यावश्यक आहे. ढगाळ व थंड वातावरणामुळे किडींची वाढ जलद होत असल्याने पुढील १०–१५ दिवस तूर शेतकरी विशेष सतर्क राहणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
- डॉ. प्रविण राठोड, डॉ. धनराज उंदिरवाडे व डॉ. अजय सदावर्ते
(किटकशास्त्र विभाग, डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला)
