गोंदिया : सध्या तूर पीक फुलावर आहे. मागील काही आठवड्यात असणारे ढगाळ वातावरण व रात्रीचे थंड हवामान असल्यामुळे तूर पिकाचे शेंगा पोखरणाऱ्या अळ्यापासून नुकसान होण्याची शक्यता आहे.
तरी शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाची पाहणी करुन वेळीच उपाययोजना करून व्यवस्थापन करण्याची गरज आहे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश कानवडे यांनी केले आहे.
पहिली फवारणी :
पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना ५ टक्के निंबोली अर्क किंवा अझाडिरेक्टीन ३०० पीपीएम एक हजार मिली प्रती एकर किंवा अझाडिरेक्टीन एक हजार ५०० पीपीएम ५०० मिली प्रती एकर किंवा एचएएनपीव्ही २०० एलई. प्रती एकर किंवा बॉसिलस थुरिनजिएसिस ३०० मिली प्रती एकर किंवा क्विनॉलफॉस २५ ईसी., ४०० मिली. प्रती एकर याप्रमाणे कोणत्याही एका किटकनाशकांची पाण्यात मिसळून फवारणी करावी.
दुसरी फवारणी :
(पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी) : इमामेक्टीन बेझोएट ५ एसजी. ६० ग्रॅम प्रती एकर किंवा लॅब्डा सायहॅलोथ्रिन ५ टक्के ईसी. २०० मिली प्रती एकर किंवा ईथिऑन ५० टक्के ईसी. ५०० मिली प्रती एकर किंवा क्लोरॅन्ट्रॅनीलिप्रोल १८.५ टक्के एससी. प्रवाही ६० मिली प्रती एकर याप्रमाणे कोणत्याही एका किटकनाशकाची पाण्यात मिसळून फवारणी करावी.
एकात्मिक व्यवस्थापन :
या तिनही किडी कळ्या, फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनासाठी जवळ-जवळ सारखेच उपाय योजावे लागतात. प्रति हेक्टर २० पक्षीथांबे शेतात उभारावेत, त्यामुळे पक्षी किडीच्या अळ्या खाऊन फस्त करतात. तसेच घाटे अळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी २० कामगंध सापळे लावावेत.
