Tur Crop Management : राज्यातील अनेक भागात सध्या तुरीचे पीक फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. मात्र बदलत्या हवामानामुळे आणि सलग एकाच पिकाची लागवड केल्याने तुरीच्या पिकावर करपा आणि मर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. (Tur Crop Management)
यंदा काही भागात पावसाचा अतिरेक, ढगाळ वातावरण आणि ओलसर हवा यामुळे तुरीचे पीक वाळत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे.(Tur Crop Management)
रोगांचा प्रादुर्भाव आणि कारणे
करपा हा विषाणूजन्य रोग असून त्याचा प्रसार प्रामुख्याने कोळी किडीमार्फत होतो. या रोगामुळे झाडाच्या खोडावर काळे-करडे चट्टे दिसतात, झाडाची वाढ खुंटते आणि शेंगा धरण्याची प्रक्रिया थांबते. त्यामुळे तुरीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वाढते.
तर मर रोगात पानांच्या शिरा पिवळ्या होतात, पाने गुंडाळतात आणि झाड हळूहळू वाळते. या दोन्ही रोगांचा परिणाम एकत्र झाल्यास तूर पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते.
कृषितज्ज्ञांचा सल्ला
कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा येथील विषयतज्ज्ञ प्रवीण देशपांडे आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अमोल झापे यांनी सांगितले की, तूर पिकावर करपा आणि मर रोगांचे नियंत्रण करण्यासाठी खालील उपाय प्रभावी ठरतात :
प्रतिबंधक उपाययोजना
शेतात पाणी साचू देऊ नका. तूर पिकाला पाण्याचा अतिरेक सहन होत नाही.
ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
बुरशीनाशक फवारणी
मेटालॅक्झिल ४% + मन्कॉझेब ६४% WP — २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
आवश्यकता असल्यास ८ ते १० दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
रोग नियंत्रणाचे पूरक उपाय
मागील हंगामातील तुरीची झाडे शेतात किंवा बांधावर उभी ठेवू नयेत, कारण त्यावर रोगजंतू टिकून राहतात.
तूर पिकाचा खोडवा घेणे टाळावे.
रोगग्रस्त झाडे दिसताच त्वरित उपटून जाळून नष्ट करावीत.
कीटकनाशक फवारणी (रोगाच्या सुरुवातीस)
डायकोफॉल १८.५ ईसी – २ मिली/लिटर पाणी
डायफेनथिअरॉन ४७.८०% एससी – १.२ ग्रॅम/लिटर पाणी
गंधक ८० डब्ल्यूपी – २.५ ग्रॅम/लिटर पाणी
ही फवारणी रोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेत केल्यास फार परिणामकारक ठरते, असे कृषितज्ज्ञ सांगतात.
शेंगा पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन
तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास पुढील उपाय करावेत
निंबोळी अर्क (५%) फवारणी करावी
किंवा क्विनॉलफॉस २५% – २० मिली / १० लिटर पाणी
किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५% – ४.५ ग्रॅम / १० लिटर पाणी
पाण्याचा ताण टाळा
फुलोरा व शेंगा धरण्याच्या अवस्थेत असलेल्या तूर पिकास पाण्याचा ताण बसू देऊ नका. आवश्यकतेनुसार हलके पाणी द्या.
तूर पिकावर करपा, मर आणि अळी यांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांनी वेळीच योग्य उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. बदलत्या हवामानाचा फटका पिकांना बसत असला तरी वेळेवर फवारणी आणि रोगनियंत्रण केल्यास पिकाचे नुकसान टाळून उत्पादन वाढवता येते.
हे ही वाचा सविस्तर : Tur Production : राज्यात वाढणार तुरीचे उत्पादन; जाणून घ्या काय आहे कारण
