Tomato Lagvad : पावसाळ्यामध्ये टोमॅटोची पुनर्लागवड करताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यामध्ये जास्त पावसामुळे टोमॅटोच्या मुळांमध्ये पाणी साठून ते कुजण्याची शक्यता असते, त्यामुळे चांगली निचरा होणारी जमीन निवडणे महत्वाचे आहे. तसेच, योग्य जातीची निवड, खतांचे व्यवस्थापन आणि रोग-राईंपासून संरक्षण करणे आवश्यक आहे.
पावसाळी टोमॅटो पुनर्लागवड
- शेतामध्ये सऱ्या पाडून जमिनीच्या उतारानुसार वाफे तयार करून घ्यावेत.
- टोमॅटोची रोपे तयार झाल्यानंतर लागवडीच्या वाफ्यांना आठवड्यापूर्वी पाणी देऊन वाफसा स्थिती ठेवावी.
- लागवडीच्या दिवशी वाफ्यांना पुन्हा पाणी द्यावे. वाफ्यांमध्ये पाणी असतानाच ओल्यातच रोपांची लागवड करावी.
- पुनर्लागवडीपूर्वी रोपवाटिकेमध्ये साधारणतः एक आठवडा अगोदर पाण्याची मात्रा हळूहळू कमी करावी. म्हणजे रोपे कणखर होतात.
- लागवडीसाठी वाफ्यातून रोपे काढण्यापूर्वी एक दिवस आधी वाफ्यांना पाणी द्यावे. त्यामुळे रोपांची मुळे न तुटता रोपे सहज निघतात.
- पुनर्लागवडीसाठी २५ ते ३० दिवसांची, १० ते १५ सें.मी. उंच व साधारण ६ ते ८ पाने असलेली रोपे निवडावीत.
- लागवडीसाठी योग्य वाढीची सशक्त रोपे निवडावीत.
- मरगळलेली, इजा झालेली, मुळे कमी असणारी, वाकडे व पातळ खोड असणारी तसेच रोगट रोपे पुनर्लागवडीसाठी वापरु नयेत.
- पुनर्लागवडीपूर्वी रोपांची मुळे इमिडाक्लोप्रिड (१७.८ एसएल) ४ मि.ली. अधिक मेटॅलॅक्झिल एम (३१.८ इएस) ६ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या द्रावणात १०-१५ मिनिटे बुडवून घ्यावीत.
- नर्सरीमधून आणलेल्या रोपांच्या ट्रेमध्येच वरील द्रावणाची आळवणी करावी. (पावसाची उघडीप असताना फवारणी करावी)
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी