Tomato Farming : टोमॅटोची रोपे कोलमडणे ही एक सामान्य समस्या आहे, जी विविध कारणांमुळे होऊ शकते. या समस्येचे मुख्य कारण म्हणजे बुरशीजन्य रोग (damping off), ज्यामध्ये रोपांचे खोड कुजते आणि ते जमिनीवर पडतात. याविषयी माहिती घेऊयात, त्याचे निराकारण कसे करावे, हेही समजून घेऊयात...
टोमॅटो रोपे कोलमडणे (डम्पिंग ऑफ)
- हा बुरशीजन्य रोग रायझोक्टोनिया, फायटोप्थोरा किंवा पिथियम या बुरशीमुळे होतो.
- रोपवाटिकेत आणि पुनर्लागवडीनंतर रोप वाढीच्या प्राथमिक अवस्थेत प्रादुर्भाव दिसून येतो.
- बियाणे पेरल्यानंतर गादीवाफ्यावर रोप उगवून जमिनीवर येण्यापूर्वीच रोगाचा प्रादुर्भाव होऊन मरते.
- बियांतून बाहेर येणारा अंकुर कुजतो. रोपाचे मूळ व खोडाचा जमिनीलगतचा भाग कुजतो व रोप उन्मळून पडते.
व्यवस्थापन कसे करावे?
- रोपवाटिकेसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी.
- गादीवाफ्यांना कमी प्रमाणात पाणी नियमित पाणी देऊन वाफसा स्थिती ठेवावी.
- बियाणे जास्त दाट पेरू नये.
- चांगल्या कुजलेल्या शेणखताचा वापर करावा.
- प्रति किलो बियाण्यास, कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
- रासायनिक नियंत्रण (प्रमाण रू प्रति लिटर पाणी),
- मेटॅलॅक्झिल एम (३१.८ ई.एस.) २.५ ग्रॅम किंवा थायोफेनेट मिथिल (३८ %) + कासुगामायसिन (२.२१ % एससी) (संयुक्त बुरशीनाशक) २.५ मिली किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (०.३ टक्का) २.५ ते ३ ग्रॅम या प्रमाणे प्रति झाड ५० ते
- १०० मिली या प्रमाणात आळवणी करावी.
(पावसाची उघडीप असताना फवारणी करावी)
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी